महादेवाच्या दर्शनाहून परतणार्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात : चौघे ठार, सहा गंभीर
नांदेड (मंगळवार, 1 ऑगस्ट 2026) : चालकाचे भरधाव जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परत असताना हा अपघात सोमवार, 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिपला नाईक तांड्याजवळ घडला.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
तेलंगणा राज्यातील पारडी (बी) येथील भाविक श्रावण मासानिमित्त सोमवार, 31 ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील कैलास टेकडी येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले असता दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कैलास टेकडीवरून ते सहस्रकुंडकडे रवाना झाले. सहस्रकुंड येथे महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर ते महिंद्रा जीप (ए.पी. 25 एच.एच. 674म) ने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारडी (बी) गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

दरम्यान, दिपला नाईक तांड्याजवळ चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला.
यांचा ओढवला मृत्यू
या अपघातात तुम सायबुलू (70), तुम गौराईबाई (60) आणि आऊला गंगन्ना (75) (सर्व रा.पारडी (बी), तेलंगणा) यांचा जागीच मृत्यू झाला तसेच जीप चालकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अपघातातील अन्य सहाजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील भैंसा (हैसा) येथे हलवण्यात आले आहे.

