जळगावात 11.17 लाखांच्या ‘इफेड्रीन’सह गांजा जप्त
एका आरोपीला अटक : जळगाव गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई
जळगाव (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ‘इफेड्रीन’ या अमली पदार्थासह गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. नऊ लाख 81 हजार पाचशे रुपये किंमतीचे इफेड्रीन, एक लाख पाच हजार सातशे रुपये किंमतीचा गांजा व 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून 11 लाख 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी रोड परिसरातील नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी एक इसम कच्च्या रस्त्यावर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 11.40 वाजता संशयीत नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय 55, रा. रामनगर, मेहरूण, जळगाव) हा दुचाकीवरून येताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीकडील एक किलो 963 ग्रॅम वजनाचे नऊ लाख 81 हजार 500 रुपये किंमतीचे इफेड्रीन, दोन किलो 114 ग्रॅम वजनाचा व एक लाख पाच हजार 700 रुपये किंमतीचा गांजा तसेच 30 हजार रुपये किंमतीची बर्गमन मोपेड (एम.एच.19 ई.के.4305) मिळून एकूण 11 लाख 17 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त केलेल्या पांढर्या रंगाच्या पदार्थात इफेड्रीन आणि दुसर्या पदार्थात गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

