आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश ; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर


यावल (मंगळवार, 1 ऑगट 2026)  : यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, मौजे यावल, ता.यावल येथील गट क्रमांक 1233 मधील जागा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये सदर जागा संबंधित आदिवासी विभागास वसतिगृहाच्या प्रयोजनासाठी वितरित करण्यात आली आहे.

दर्जेदार निवासाची सुविधा मिळणार
या मंजुरीमुळे यावल तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सुरक्षित, दर्जेदार आणि सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.


आमदार अमोल जावळे यांचा पुढाकार
यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहाची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून, वसतिगृहासाठी शासकीय जागा मंजूर झाली आहे. यासोबतच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सुविधा व कार्यालये यावल येथे उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही प्रयत्न करण्याचा आमदार अमोल जावळे यांचा मानस आहे. या जागेचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करणे, निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करणे तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरी घेणे यासह आदेशातील सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रक्रियेला लवकरच येणार गती
मंजूर जागेचा ताबा देणे, मोजणी व सीमांकन करणे तसेच महसूल अभिलेखात आवश्यक त्या नोंदी घेण्याची पुढील कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर वसतिगृहाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या या निर्णयाबद्दल यावल तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आमदार अमोल जावळे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !