कचरा, रस्ते, अतिक्रमण व औषध फवारणीवरून रावेर नगरपालिकेची सभा गाजली
नगरसेवक राजेंद्र चौधरींचा आक्रमक पवित्रा कर्मचार्यांची उत्तरे देताना तारांबळ 138 विषयांना मंजुरी
रावेर (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : रावेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा संकलन, औषध फवारणी, अतिक्रमण, खराब रस्ते, पथदिवे आणि विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाली. नागरिकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. शहरातील अत्यावश्यक कामे झालीच पाहिजेत, त्यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी घेतल्याने सभा चांगलीच गाजली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संबंधित कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
138 विषयांना मंजुरी
रावेर नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष संगीता महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या सभेत एकूण 138 विषयांना मंजुरी देण्यात आली.

कचरा संकलन ठप्प : संबंधित विभागाची झाडाझडती
रावेर शहरातील कचरा संकलन व्यवस्था ठप्प झाल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी संबंधित विभागाला धारेवर धरले. नागरिकांना नियमित सेवा मिळत नसेल तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेवक बंटी महाजन यांनीही आक्रमक भूमिका घेत शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला तसेच मजूर पुरविणार्या ठेकेदाराच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या.
मूलभूत सुविधांमध्ये तडजोड नको
नगरसेवक पिंटू वाघ यांनी शहरातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांच्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. शहरातील विविध भागांतील समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.नगरसेविका सीमा आरिफ जमादार यांनीही कर्मचार्यांना फैलावर घेत आपल्या प्रभागातील पथदिव्यांचा प्रश्न उपस्थित केला. काही भागात कचरा संकलनाची गाडी नियमित येत नसल्याची तक्रार करत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.
पुनखेडा रस्त्यावर स्मशानभूमीचा प्रस्ताव
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुनखेडा रस्त्याने नवीन स्मशानभूमी मंजूर करण्याचा प्रश्न नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सभागृहात मांडला. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातील नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद, नगरसेवक अर्चना पाटील, गणेश पाटील, राजेश शिंदे, सपना महाजन, पद्माकर महाजन यांच्यासह इतर नगरसेवकांनी शहरातील विविध समस्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे हे नाशिक येथे गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत ही सभा पार पडली. सभेला नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

