घोडदे गावात 9 सप्टेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताह ; ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची जय्यत तयारी
नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून रंगणार ज्ञानयज्ञ ; 16 सप्टेंबरला काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसाद
घोडदे, ता.साक्री (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर घोडदे येथे 9 ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्यामुळे घोडदेसह पंचक्रोशीतील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी सामुदायिक हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन ह.भ.प. शामसुंदर महाराज सौंदाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी
या ज्ञानयज्ञात विविध ठिकाणचे नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. यामध्ये ह.भ.प. खुशाल महाराज पिंपळे (चाळीसगाव), ह.भ.प. गोपाळ महाराज चिमठाणे, ह.भ.प. यशवंत महाराज गणेशपूर (चाळीसगाव), ह.भ.प. भूषण महाराज चोंगाव, ह.भ.प. समाधान महाराज शिरणगाव, ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर, ह.भ.प. प्रथमेश महाराज मुंजवाड (सटाणा) तसेच ह.भ.प. साहिल महाराज तळेगाव (चाळीसगाव) यांचा समावेश आहे.
कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक चिंतन व भक्तीचा अनुभव घेता येणार आहे.
16 सप्टेंबरला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद
सप्ताहाची सांगता 16 सप्टेंबर रोजी काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसादाने होणार आहे. महाप्रसाद सेवेसाठी श्री. कमलाकर पंडित क्षिरसागर (गाडीवाले आबा) आणि श्री. सचिन दळवी (व्यापारी, सुरत भाजीपाला मार्केट) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या भक्तिसोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक, वारकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन बजरंग भजनी मंडळ घोडदे व ग्रामस्थ घोडदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भजनी मंडळाचे सदस्य दिनेश भामरे (भामरेआबा) यांनी दिली.

