भुसावळच्या सोमानी उद्यानातील लोखंडी जाळ्यांची चोरी : पालिका अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांचे शहर पोलिसांना निवेदन कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा


भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील जी.डी. सोमानी उद्यानाच्या संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळी व लोखंडी अँगलची गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सातत्याने चोरी होत असताना तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित नगरपालिका अधिकारी व जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देवून करण्यात आली.

काय आहे मागण्या ?
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष (जळगाव पूर्व) बाळा पवार यांनी भुसावळ शहर पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, जी.डी. सोमानी उद्यानाच्या संरक्षण भिंतीवर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून लोखंडी जाळी व अँगल बसविले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून या लोखंडी साहित्याची चोरी होत असून चोरट्यांनी कटर मशीनच्या साहाय्याने संरक्षण भिंतीची तोडफोड केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


चोरी झालेली लोखंडी जाळी व अँगल सुमारे 400 ते 500 फूट असल्याचे नमूद करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नागरिकांनी माहिती देऊनही पोलिसांत तक्रार नसल्याचा आरोप
उद्यानाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. परिसरातील नागरिकांनी चोरीबाबत नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व विभागप्रमुखांना अनेक वेळा माहिती दिली मात्र त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली नाही किंवा पोलिस ठाण्यात चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

तक्रारींना पालिका प्रशासनाकडून केराची टोपली
सार्वजनिक मालमत्तेची चोरी ही गंभीर बाब असून संबंधित अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा दावा करत जबाबदार अधिकार्‍यांची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
जी.डी. सोमानी उद्यानातील चोरीची तातडीने चौकशी करून नगरपालिकेच्या संबंधित विभागातील जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाळा पवार यांनी केली आहे.

तर तीव्र आंदोलनाचा इशारा
या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास भुसावळ नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !