दिव्यांगांच्या राखीव जागांवर कब्जा : अनधिकृत फेरीविक्रीला चाप ; भुसावळ विभागात 7780 प्रकरणांवर कारवाई
भुसावळ (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे परिसरातील शिस्त आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2026 दरम्यान विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेत सात हजार 780 प्रकरणे नोंदवून तब्बल 65 लाख 29 हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा दल तसेच वाणिज्य विभागातील अधिकारी आणि निरीक्षकांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. रेल्वे अधिनियमातील विविध तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे परिसर, डबे आणि ट्रॅक परिसरात व्यापक तपासणी करण्यात आली.
दिव्यांगांच्या राखीव जागांवर अनधिकृत कब्जा
रेल्वे अधिनियम, 1989 मधील कलम 155(1)(क) व 155(1)(ख) अंतर्गत अनधिकृत प्रवेश तसेच रेल्वे प्रशासनाने राखीव ठेवलेल्या जागा किंवा बर्थवर अनधिकृतपणे कब्जा करण्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डबे व जागांचाही समावेश आहे.
15 लाख 31 हजारांचा दंड वसुल
या कारवाईत 1,094 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 15 लाख 31 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला. दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या राखीव सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
रेल्वे अधिनियमातील कलम 144 अंतर्गत गाड्यांमध्ये आणि रेल्वे परिसरात अनधिकृत फेरीविक्री, भिक्षा मागणे तसेच प्रचार अथवा विक्रीसाठी आग्रह धरणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत एक हजार 687 प्रकरणे नोंदवून 25 लाख 615 रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे परिसरातील गर्दीवर नियंत्रण, स्वच्छता आणि प्रवाशांची सुरक्षितता या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली.
रेल्वे ट्रॅकवर अनधिकृत प्रवेशाला आळा
रेल्वे अधिनियम, 1989 मधील कलम 147 नुसार रेल्वे रूळ किंवा रेल्वे मालमत्तेवर अनधिकृतपणे प्रवेश करणे दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे ट्रॅकवरून जाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष तपासणी करण्यात आली. या अंतर्गत चार हजार 999 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 24 लाख 97 हजार 530 रुपये दंड वसूल करण्यात आला.
‘शॉर्टकट’ टाळा; सुरक्षित मार्गाचाच वापर करा
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी शॉर्टकटचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. ट्रॅक ओलांडताना काही मिनिटे वाचू शकतात; मात्र त्यासाठी जीव धोक्यात घालणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी रस्ता उड्डाणपूल, रस्ता भुयारी मार्ग, समपार फाटक किंवा पादचारी पूल अशा अधिकृत मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन भुसावळ विभागाने केले आहे.
रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधा
मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून, अशा विशेष तपासणी व जनजागृती मोहिमा आगामी काळातही सुरू राहणार आहेत. रेल्वे परिसरात अनधिकृत किंवा धोकादायक प्रकार आढळल्यास प्रवाशांनी जवळच्या ड्युटीवरील रेल्वे कर्मचार्यांना माहिती द्यावी किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

