16 वर्षांपूर्वी लाचेत अडकलेला भुसावळातील ‘भगवान’ दुसर्‍यांदा पुन्हा एसीबीच्या जाळ्यात

जामनेरातील भूमी अभिलेखच्या भूकर मापक भगवान गायकवाडला दोनशे रुपयांची लाच घेताना अटक


गणेश वाघ
भुसावळ (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : सुमारे 16 वर्षांपूर्वी लाचेच्या जाळ्यात अडकलेला भुसावळातील भगवान गायकवाड हा जामनेरात पुन्हा अवघ्या दोनशे रुपयांची लाच घेताना एसीबीच्या गळाला लागला आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शेतजमीन मोजणीसाठी मागितली लाच
सूत्रानुसार, शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी तडजोडीअंती 200 रुपयांची लाच जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक भगवान रोहिदास गायकवाड (49, रा.प्लॉट क्र. 69, लहूलिला नगर, ढोके नगराजवळ, भुसावळ) याने मागितल्याचा आरोप आहे.

पडताळणीत लाच मागितल्याचे उघड
तक्रारदार शेतकरी असून त्यांना जामनेर तालुक्यातील नेरी बु.॥ येथील शेतजमिनीची मोजणी हवी असल्याने त्यांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे अर्ज केला होता. मोजणीसाठी आवश्यक रक्कम व टिपण उतार्‍याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे 700 रुपये लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली

कार्यालयातून केली अटक
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान आरोपीने तडजोडीअंती 200 रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्ट होताच मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.

एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी भगवान गायकवाड विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात 2012 मध्ये लाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतरही लाचेचा मोह न सुटल्याने दुसर्‍यांदा भगवान लाचेच्या जाळ्यात अडकला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !