सात जणांच्या मृत्यूनंतर धोकादायक इमारतींवर एमसीडीची धडक कारवाई : लेबर कॉन्ट्रॅक्टरसह चौघांना अटक
देशभरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात : धोकेदायक ‘कनक लता’ इमारत पाडण्यास सुरुवात
नवी दिल्ली (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : सत्य निकेतन परिसरातील पीजी इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील इमारतींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने परिसरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली असून, नवी दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) दुर्घटनाग्रस्त इमारतीला लागून असलेली ‘कनक लता’ इमारत पाडण्यास मंगळवारी सुरुवात केली. या इमारतीला यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आले होते.
आज पुन्हा होणार कारवाई
6 सप्टेंबर रोजी ‘हॉस्टेल डेज’ पीजीची इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर शेजारील इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मंगळवारी सुरू करण्यात आलेली पाडकामाची कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती आणि बुधवारी सकाळी ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

दुर्घटनेपूर्वीच ‘कनक लता’ इमारतीच्या भिंतींना तडे
सत्य निकेतन दुर्घटनेने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वी शेजारील ‘कनक लता’ हॉस्टेलमध्ये राहणार्या दोन विद्यार्थिनींनी त्यांच्या खोलीतील भिंती आणि छताला पडलेल्या भेगांचा व्हिडिओ तयार केला होता. अर्निका आणि मानसी या दिल्ली विद्यापीठाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी आहेत. व्हिडिओमध्ये भिंतींवर लांब व खोल तडे स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये 20 वर्षीय अर्निकाचा घाबरलेला आवाजही ऐकू येतो. ती, ‘वाटतंय, पडणार आहे,’ असे म्हणताना दिसते. शेजारील इमारत कोसळल्यानंतर ‘कनक लता’ इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने ती धोकादायक असल्याचे घोषित करून पाडकामाचा निर्णय घेतला.
इमारत दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक
सत्य निकेतन पीजी इमारत कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टरला उत्तर प्रदेशातील कासगंज येथून अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. यापूर्वी पीजीचे मालक हरिराम, त्यांची पत्नी उर्मिला आणि त्यांचा मुलगा महेश यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जुन्या पायावर अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याने इमारतीच्या संरचनेवर अधिक भार पडला असण्याची शक्यता तपासली जात आहे.
पीजी दुर्घटनेनंतर 1120 इमारतींचे सर्वेक्षण
एमसीडी आयुक्त संजीव खिरवार यांच्या आदेशानंतर दिल्लीतील पीजी इमारतींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी तपासलेल्या एक हजार 120 पीजींपैकी 52 इमारती जीर्ण किंवा धोकादायक अवस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील दुर्घटनेनंतर प्रशासनाने शहरातील जुन्या व कमकुवत इमारतींची तपासणी करण्यास प्राधान्य दिले आहे.
आरोपी दाम्पत्य 14 दिवस न्यायालयीन कोठडीत
सोमवारी रात्री हरिराम आणि उर्मिला यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले, तर त्यांचा मुलगा महेश याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
देशभरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर
सत्य निकेतन पीजी दुर्घटनेचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयातही उमटले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा मुद्दा केवळ दिल्लीपुरता मर्यादित न ठेवता देशभरातील जीर्ण आणि बेकायदेशीर इमारतींच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे संकेत दिले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले मिकस क्युरी ज्येष्ठ वकील अजित सिन्हा यांनी 6 सप्टेंबरच्या सत्य निकेतन दुर्घटनेचा उल्लेख केला. बेकायदेशीर आणि असुरक्षित इमारतींशी संबंधित जुन्या प्रकरणात ते न्यायालयाला मदत करत आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील बेकायदेशीर बांधकामांबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. आता त्यांची अंमलबजावणी कितपत झाली, याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
एमसीडीच्या दक्षिण विभागातील पाच अधिकारी निलंबित
दुर्घटनेनंतर नवी दिल्ली नगर निगमने दक्षिण विभागाचे उपायुक्त राकेश कुमार यांच्यासह चार अभियांत्रिकी अधिकार्यांना निलंबित केले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.
यानंतर 2016 बॅचचे अधिकारी शाश्वत सौरभ यांच्याकडे एमसीडीच्या दक्षिण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते सध्या दक्षिण-पश्चिम विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

