मुंबईतच आता अंतिम लढाई ; जरांगेंचा सरकारला इशारा
मुंबई (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. 15 सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगत आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांपासून सरकारला वेळ दिला मात्र अपेक्षित निर्णय झाला नाही. आता पुढील लढा मुंबईतच होईल. सरकारने आम्हाला तुरुंगात टाकले तरी आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक इशारा जरांगे यांनी दिला.
‘सरकारने अजून आठ दिवसांत निर्णय घ्यावा’
राज्यातील पावसाची स्थिती आणि शेतीच्या कामांचा संदर्भ देत जरांगे म्हणाले की, शेतकरी सध्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याच्या स्थितीत आहे. पेरणी आणि मशागतीची बहुतांश कामे पूर्ण झाली असून त्यामुळे मराठा समाजातील बांधव आता मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होऊ शकतात. सरकारकडे अजून काही दिवसांचा अवधी आहे. या कालावधीत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईत आंदोलनाची तीव्रता वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘बावनकुळे, सावध राहा’ ; चौकशीवरून सरकारला लक्ष्य
भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहकार्यांच्या चौकशा सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आंदोलन सुरू असतानाच चौकशांचा ससेमिरा का लावला जात आहे?’ असा सवाल करत कितीही चौकशा केल्या तरी आपण मागे हटणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या सहकार्यांना यापूर्वीच चौकशांना सामोरे जावे लागू शकते, याची कल्पना दिली होती; तरीही ते आंदोलनासोबत राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भाषेच्या मुद्यावरून विरोधकांना प्रत्युत्तर
जरांगे यांच्या वक्तव्यांतील भाषेवरून सुरू असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. आपल्या मागण्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून भाषेचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांत आपण सरकारमधील नेत्यांशी संयमाने संवाद साधला मात्र वारंवार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी एमपीएससीसह मराठा समाजाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचाही उल्लेख करत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
मुंबईकडे पाच दिवसांचा प्रवास ; आंदोलनाची तयारी सुरू
15 सप्टेंबरपासून प्रस्तावित ‘मुंबई चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईकडे जाण्याची तयारी केली जात आहे. विविध भागांतून आंदोलक मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
‘मुंबईच्या वेशीवर कायदेशीर तटबंदी करू’; सदावर्तेंचा इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीला सातत्याने विरोध करणारे अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित मुंबई आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जरांगे यांच्या मागण्या घटनात्मक चौकटीत मान्य होऊ शकत नाहीत, असा दावा करत त्यांनी मुंबईकडे येण्यापूर्वी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर टीका करताना सदावर्ते यांनी त्या पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. जरांगे यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येणार नसल्याचे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत येण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलनाला अटकाव करण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील आंदोलनाची तयारी करत असताना दुसरीकडे सदावर्ते यांच्या भूमिकेमुळे संघर्षाची शक्यता अधिक तीव्र झाली आहे.

