वनहक्काच्या प्रश्नावर लोक संघर्ष मोर्चाची 14 सप्टेंबरला भुसावळात महत्त्वपूर्ण बैठक
भुसावळ (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : वनहक्क कायद्याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेले विविध निर्णय, वनहक्क दावेदारांना 7/12 उतारे देण्याचे धोरण तसेच प्रलंबित वनहक्क दाव्यांबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने सोमवार, 14 सप्टेंबर रोजी भुसावळ येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवारी दुपारी एक वाजता नाहटा कॉलेज चौक, चंद्रकांत चौधरी यांच्या घराजवळील शिव मंदिर, भुसावळ येथे होईल. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड आणि चाळीसगाव तालुक्यातील लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते व संबंधित सहकार्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंशतः मंजूर वनहक्क दाव्यांवर चर्चा
शासनाच्या नव्या 7/12 धोरणाच्या पार्श्वभूमीवर अंशतः मंजूर झालेल्या वनहक्क दाव्यांचा प्रश्न बैठकीत प्रमुखत्वाने चर्चिला जाणार आहे. अनेक दावेदारांना त्यांच्या मागणीपेक्षा कमी क्षेत्र मंजूर झाले आहे. अशा परिस्थितीत 7/12 उतारा मिळाल्यानंतर मंजूर क्षेत्रावरच कायमस्वरूपी कायदेशीर हक्क निश्चित होईल का, तसेच उर्वरित क्षेत्रासाठी भविष्यात कायदेशीर कार्यवाही करता येईल का, याबाबत संघटनेची भूमिका निश्चित केली जाणार आहे.
प्रलंबित दावे आणि शासकीय योजनांवरही चर्चा
वनहक्क मिळाल्यानंतरही अनेक कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात येणार आहे तसेच प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित असलेल्या व्यक्तिगत वनहक्क दाव्यांबाबत पुढील कृतीची दिशा ठरविण्यात येणार आहे सामुदायिक वनहक्क प्राप्त झालेल्या गावांमध्ये विकासकामे आणि विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे, तसेच वनहक्कधारक कुटुंबातील महिला, शेतकरी आणि युवकांना विशेष शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याबाबतही नियोजन केले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाकडे लक्ष
वनहक्काच्या प्रश्नाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणही बैठकीतील महत्त्वाचा विषय राहणार आहे. या प्रकरणात कोणत्याही वेळी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने निर्णयानंतरची भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत संघटितपणे तयारी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ही केवळ बैठक नसून वनहक्काच्या पुढील लढ्याची दिशा ठरविणारी बैठक आहे, असे आवाहन लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी केले आहे. तालुक्यातील सर्व अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि संबंधित सहकार्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत चौधरी यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.

