भुसावळातील महात्मा गांधी संकुलातील धोकेदायक पॅरापीट पालिकेने तोडले
भुसावळ (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : शहरातील यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील डी.एस.हायस्कूलला लागून असलेल्या महात्मा गांधी संकुलातील वरच्या मजल्यावरील पॅरापीट अत्यंत जीर्ण झाल्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही भाग दुकानांच्या छतावर कोसळल्याचा प्रकार घडला होता. सुदैवाने यावेळी ग्राहक वा दुकानातील कर्मचारी नसल्याने मोठी प्राणहानी टळली होती. या प्रकारानंतर पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती. ‘भुसावळ जंक्शन’ने या प्रकरणी ठळक वृत्त प्रसिद्ध करीत लक्ष वेधले होते. पालिका प्रशासनाने शनिवारी सकाळी घटनास्थळी धाव घेत जीर्ण असलेल्या पॅरापीट तोडून मोकळे केल्याने आता मुसळधार पाऊ आलातरी दुर्घटनेची शक्यता कमीच आहे.
उशिरा का असेना पालिकेला जाग
डी.एस.हायस्कूलला लागून असलेल्या महात्मा गांधी संकुलात चाजनीज,आईस्क्रीम तसेच अन्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानांवर सिमेंट काँक्रीटच्या जीर्ण पॅरापेट वॉलमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. गतवर्षी 14 जुलै 2025 रोजी व्यावसायीकांनी पालिकेला निवेदन देत दखल घेण्याची मागणी केली होती मात्र पालिकेला जाग आली नाही व शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता तिसरल्या मजल्यावरील पॅरापीटचा काही भाग दुकानांच्या पत्र्यावर कोसळला मात्र सुदैवाने प्राणहानी टळली.
पालिकेने तोडले जीर्ण पॅरापीट
शनिवारी सकाळी पालिका प्रशासनाने धाव घेत संपूर्ण जीर्ण पॅरापीट तोडले. यावेळी रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली तर व्यावसायीकांनी देखील दुर्घटना टळण्यासाठी दुकाने बंद ठेवली. जीर्ण पॅरापीट तुटल्याने आता तिसर्या मजल्यावरून सिमेंट काँक्रिटीचा भाग कोसळण्याची शक्यता कमी आहे.
महिला सभापतींचा इशाराही दुर्लक्षित
भुसावळ पालिकेच्या महिला बालसभापती शोभा इंगळे यांनीदेखील 9 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी संकुलातील जीर्ण पॅरापीट वॉलबाबत नगरपालिकेला पत्र दिले होते. पावसाळ्यात या जीर्ण पॅरापीटमुळे मोठा अपघात होण्याची भीती त्यांनी वर्तवली होती मात्र त्यानंतरही पालिकेला तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात जाग आलीच नाही.
पालिका संकुलाची लवकरच दुरुस्ती : नगराध्यक्षा
शहरातील सर्वच पालिका संकुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया निघाली असून लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच कामांना सुरूवात होईल. पालिका संकुलाची डागडूजी होईल शिवाय रंगरंगोटीची कामेदेखील पूर्ण केली जातील, असे नगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या.

