मनोज जरांगे-पाटील अधिक आक्रमक ; पाणी-उपचारही सोडले ! उद्याच्या मुंबई कूचवर ठाम
आज दुपारी मोठी घोषणा ! आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज
अंतरवाली सराटी, जि.जालना (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस असून, आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर आंदोलनाने आता अधिक आक्रमक वळण घेतले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांनी पाणी तसेच वैद्यकीय उपचार घेणे बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आझाद मैदानासाठी त्यांनी पुन्हा अर्ज दाखल केला असून, परवानगी न मिळाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याच्या भूमिकेवर ते ठाम असून, आज दुपारी होणार्या पत्रकार संवादात ते नेमकी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचा नकार, जरांगेंचा आक्रमक पवित्रा
आझाद मैदानावरील उपोषणासाठी केलेल्या अर्जाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली. रविवारी रात्री वैद्यकीय पथकाने दोन वेळा तपासणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी सलाईन आणि उपचार घेण्यास नकार दिला.



आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज ; न्यायालयात जाण्याची तयारी
परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांकडे नव्याने अर्ज दाखल केला आहे. या अर्जालाही परवानगी नाकारल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
उद्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच
पोलिसांचा नकार असला तरी 15 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील आणि मराठा समाज ठाम असल्याचे चित्र आहे. या प्रवासातील पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार असून, त्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली आहे.
‘वर्षा’वर सरकारची खलबते
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे रविवारी रात्री तातडीची बैठक झाली. मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला उपस्थित होते. आंदोलन मुंबईच्या वेशीवर रोखायचे की पुन्हा चर्चा करून तोडगा काढायचा, यावर बैठकीत मंथन झाल्याचे समजते.
गणेशोत्सवामुळे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी तूर्त आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आजच्या घोषणेकडे सरकारसह मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
