मुलगा मानला… त्यानेच जीव घेतला ! पारोळ्यात दागिन्यांसाठी 85 वर्षीय मामीचा घात

35 दिवसांनी भाच्याचा कारनाम्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश : सीसीटीव्ही फुटेजने मिळाला ‘क्लू’


पारोळा, जि.जळगाव (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : अपत्य नसल्याने ज्या भाच्याला स्वतःचा मुलगा मानून वेळोवेळी आर्थिक मदत केली, त्याच भाच्याने वृद्ध मामीच्या दागिन्यांवर डोळा ठेवून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारोळा तालुक्यातील करंजी येथील वैजयंती गणपत माळी (85) या वृद्धेच्या खून प्रकरणाचा पारोळा पोलिसांनी तब्बल 35 दिवसांच्या अथक तपासानंतर छडा लावला. संशयित प्रशांत उत्तम माळी याला पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी धुळ्यात बेड्या ठोकल्या. आरोपीच्या चौकशीत खुनाची धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याच्या सांगण्यावरून 13 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष व सांगाडा आढळून आला.

घरातून बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडे मिसिंग
वैजयंती माळी या पतीच्या निधनानंतर करंजी येथे एकट्याच राहत होत्या. त्यांना स्वतःची अपत्ये नव्हती त्यामुळे सख्या बहिणीचा मुलगा प्रशांत माळी याला त्या मुलाप्रमाणे मानत होत्या. त्याला वेळोवेळी आर्थिक मदतही त्यांनी केली. दरम्यान, 3 ऑगस्ट 2026 रोजी वैजयंती माळी या अचानक घरातून बेपत्ता झाल्या. त्यांचा शोध लागला नाही. अखेर 9 ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू असतानाच 19 ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा (गु.र.क्र. 322/2026, कलम 138(2) बीएनएस) दाखल करण्यात आला.




प्रशांतही अचानक गायब ; पोलिसांचा संशय बळावला
तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, वैजयंती माळी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा प्रशांत उत्तम माळी हादेखील अचानक गायब झाल्याने प्रशांतच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब पुढे आली. प्रशांतवर एचडीएफसीचे कर्ज तसेच इतर उधारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुसरीकडे वैजयंती माळी यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याचे त्याला माहिती होते त्यामुळे आर्थिक अडचणी आणि दागिन्यांचा मोह या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फुटेजने दिली महत्त्वाची दिशा
पोलिसांनी करंजी व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे सहा वाजता प्रशांत करंजी गावात आल्याचे आढळून आले. तसेच एका फुटेजमध्ये वैजयंती माळी या घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसल्याने या फुटेजमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली. पोलिसांनी प्रशांतचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय केली.

खोटे कारण सांगून वृद्धेला विश्वासात घेतले
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांतने वैजयंती माळी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या साडूच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधीसाठी शिरसोली येथे जायचे आहे, असे खोटे सांगितले. या कारणावरून त्याने वैजयंती यांना आपल्यासोबत नेले. यानंतर दागिन्यांच्या कारणावरून दोघांमध्ये झटापट झाल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर प्रशांतने वैजयंती यांना गाडीतून मुकटी, धुळे परिसरात नेले. मुकटीपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर त्याने कपड्याच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळून खून केला.

दागिने काढले अन् मृतदेह डिक्कीत टाकला
वैजयंती माळी यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशांतने त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवला आणि मुकटी येथील घरी गेला. तेथे त्याने रात्र काढली. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची, यासाठी तो दिवसभर कार घेऊन परिसरात फिरत राहिला. चौकशीत

दागिने सोनाराकडे विकले
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी प्रशांतने वैजयंती यांच्या अंगावरील दागिने एका सोनाराकडे विकल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याने मृतदेह घेऊन बायपास हायवे परिसर गाठला. तेथे ड्रेनेज पट्टीतील सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह टाकून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

35 दिवस पसार : अखेर धुळ्यात बांधल्या मुसकया
गुन्ह्यानंतर प्रशांत तब्बल 35 दिवस पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र, जळगाव पोलिसांनी मानवी गुप्तवार्ता, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम यांचा आधार घेत त्याचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 12 सप्टेंबर 2026 रोजी धुळे येथून प्रशांतला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने वैजयंती माळी यांच्या खुनाबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगाडा आणि मानवी अवशेष सापडले
संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी मृतदेह लपवण्यात आलेल्या ठिकाणी शोध मोहीम राबवली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे पुढील तपासात मृताची ओळख व मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय व न्यायवैद्यक प्रक्रिया केली जाणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !