आठव्यांदा आशिया चषकावर भारताची मोहोर : पाकिस्तानी गृहमंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार !

भारताचा श्रीलंकेवर 72 धावांनी दणदणीत विजय ; पंतप्रधानांकडून संघाचे कौतुक


दुबई (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या महिला आशिया चषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 72 धावांनी पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर हा एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली. दरम्यान, टीम इंडियाने पीसीबी चीफ व पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय पुरूष संघानेही ट्रॉफी घेतली नव्हती हेही विशेष!

सलामीवीरांनी रचला विजयाचा पाया
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली.




शफाली वर्माने 68 धावांची तर स्मृती मानधनाने 59 धावांची शानदार खेळी साकारली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 129 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्याचा मजबूत पाया मिळाला.

भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावत 183 धावा फलकावर लावल्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर विजेतेपदासाठी 184 धावांचे आव्हान उभे राहिले.

भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला रोखले
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत.

युवा गोलंदाज श्री चरणीने प्रभावी गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजीची कोंडी केली. तिने चार महत्त्वपूर्ण बळी घेतले. दीप्ती शर्मानेही अचूक गोलंदाजी करत तिला उत्तम साथ दिली.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक मार्‍यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 111 धावांत गारद झाला. भारताने तब्बल 72 धावांनी अंतिम सामना जिंकत आशिया चषक आपल्या नावावर केला.

देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव पंतप्रधानांनी केले कौतुक
भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी संघाचे अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दाखवलेला आत्मविश्वास, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले.

भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशातील महिला क्रिकेटला आणखी मोठी प्रेरणा मिळाली असून, आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरत टीम इंडियाने आपल्या वर्चस्वाची पुन्हा एकदा भक्कम नोंद केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !