राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विषय घेतले का? भुसावळ पालिकेच्या सभेत भाजपेयींचा सवाल !
पालिका सभेत 32 विषयांना मंजुरी : अस्वच्छतेसह बंद पथदिवे, मोकाट कुत्र्यांचा विषय गाजला
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : राष्ट्रवादीची पालिकेवर सत्ता असताना भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डातील एकतरी विषय तुम्ही त्यावेळी घेतला का? असा अंतर्मुख करणारा सवाल भाजपेयींनी तत्कालीन राष्ट्रवादीतील व आता शिंदे सेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांना करीत अंतर्मुख केले. भुसावळ पालिकेत भाजपा सत्ताधार्यांच्या प्रभारी राजमधील दुसरी सर्वसाधारण सभा गुरुवार, 17 रोजी सकाळी 11.15 वाजता पालिका सभागृहात झाली. शहरातील बंद पथदिवे, मोकाट कुत्रे, शहरभर असलेली अस्वच्छता यावरून सभेत जोरदार चर्चा झाली. मंत्री संजय सावकारे यांनी पालिकेला विकासकामांसाठी निधी दिल्यानंतर एनओसी तुमच्या काळात देण्यात आली नाही, असे यावेळी भाजपेयींना शिंदे सेनेतील नगरसेवकांना यावेळी सुनावले. दरम्यान, सत्ताधार्यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यासह एकूण 32 विषयांना बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली.
पालिकेतील विरोधक मात्र अलीकडेच शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांनी गतवेळच्या सभेबाबत जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये चौकशी सुरू असल्याने गतवेळेची व आताची सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करीत अनेक विषयांवर आक्षेप नोंदवला.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे होत्या. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपमुख्याधिकारी परवेज शेख, गटनेता युवराज लोणारी, बबलू बर्हाटे आदींची उपस्थिती होती.
जुलै महिन्यासह आत्ताची सभा बेकायदेशीर
सभेच्य अजेंड्यावर पहिलाच विषय 16 जुलै 2026 च्या सभेचे इतिवृत्त कायम करणे असल्याने त्यावर विरोधी गटातील नगरसेवक उल्हास पगारे यांनी आक्षेप नोंदवला. गतवेळच्या सभेबाबत जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये हरकती घेण्यात आल्या असून गतवेळची सभाच बेकायदेशीर असल्याने ही सभादेखील बेकायदेशीर ठरते, असे ते म्हणाले. आठ दिवसांनी सर्व नगरसेवकांचे विषय घेवून सभा घ्यावी, असे त्यांनी सूचवले. गटनेता लोणारी यांनी जिल्हाधिकार्यांकडे चौकशी सुरू असलीतरी त्यांनी ‘स्टे’ दिला नसल्याने बहुमताच्या जोरावरच पालिका चालते, असे सांगितले. सभा जर बेकायदेशीर आहे तर तुम्ही हजर का राहिले? असा प्रतिप्रश्नही लोणारींनी पगारे यांना केला.
तुमची सत्ता असताना आमचे विषय घेतले का?
गत काळात राष्ट्रवादीची पालिकेवर सत्ता असताना भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डातील एकही विषय घेण्यात आला नाही उलट तीन्ही सभा तहकूब आपणच त्यावेळी केल्याचे यावेळी नगराध्यक्षा नारखेडे, गटनेता लोणारी, किरण कोलते, गिरीश महाजन यांनी विरोधकांना बजावले. मंत्री संजय सावकारे यांनी विकासकामांसाठी पालिकेसाठी दिलेल्या निधीवरही तुम्ही एनओसी दिली नाही, असे पदाधिकारी म्हणाल्याने विरोधक निरुत्तर झाले.
पालिका संकुलात दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण?
भुसावळातील पालिकेच्या सर्वच संकुलाची दुरावस्था झाली आहे. अलीकडेच डी.एस.हायस्कूलला लागून असलेल्या संकुलाची पडती कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असलीतरी भविष्यात काही दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न नगरसेविका शोभा इंगळे यांनी विचारला. मुख्याधिकार्यांनी लवकरच या प्रश्नी दखल घेण्याचे आश्वासन दिले.
रेल्वेच्या अतिक्रमणावर विरोधकांचे बोट
नगरसेवक उल्हास पगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडून आरपीडी रस्त्यावर अतिक्रमण करून भिंत उभारली जात असल्याने या प्रश्नी केवळ नोटीस देवून भागणार नसल्याचे सांगत प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.
मांस-मच्छी विक्रेत्यांवर हवी कठोर कारवाई
खडका रोड तसेच जळगाव रोडवर अनधिकृपणे मांस-मच्छी विक्रेते व्यवसाय करतात मात्र सायंकाळी सर्व घाण रस्त्यावर वा नाल्यात टाकली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने नोटीस बजावूनही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी गटनेता लोणारी यांनी केली. नगरसेवक आवटे यांनी प्रभाग 14 मधील अस्वच्छतेवर बोट ठेवत दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
मुख्याधिकार्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा
खडका रोड भागात सर्वात जास्त अस्वच्छता असल्याचा मुद्दा गटनेता सचिन चौधरी यांनी मांडल्यानंतर ही भूमिका व मुद्दा योग्य असल्याचे लोणारी म्हणाले. प्रत्येक गल्लीत स्वच्छता होणे आवश्यक असून आरोग्य निरीक्षक कामावरच येत नसल्याने त्यांच्यावर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी सूचना लोणारी यांनी मांडली. शहरातील अस्वच्छतेवर उल्हास पगारे यांनी बोट ठेवत सुधारणा न झाल्यास नागरिक मुख्याधिकार्यांच्या दालनात कचरा टाकतील, अशी भूमिका मांडली. नगरसेविका प्राची पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर केवळ तापी नगराची स्वच्छता म्हणजे शहराची स्वच्छता नाही, असेही पगारे यांनी बजावत संपूर्ण शहरात स्वच्छता गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.छाया देशमुख व सोनल महाजन यांनीही प्रभागातील अस्वच्छतेवर बोट ठेवले. नगरसेवक राजेंद्र आवटे यांनीदेखील अस्वच्छतेचा मुद्दा मांडत गतवेळच्या बैठकीतही या संदर्भात तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याचे सांगितले.
बंद पथदिवे व मोकाट कुत्र्यांचा विषय गाजला
शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी मांडला तर अनेक भागात दिवसा पथदिवे सुरू तर रात्री बंद असल्याचा प्रकारही नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. जुने दिवे थेट बदलून नवीन दिवे लावण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नगरसेवक सोहेल पठाण यांनीही प्रभाग 18 मध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनल्याचे सांगितले तर उल्हास पगारे यांनी काही दिवसांपूर्वी अमळनेर येथून मोकाट कुत्रे शहरात सोडण्यात आल्याचा दावा करीत या संदर्भात तक्रार करून पुरावे दिल्याचे सांगितले.
निष्ठा साहेबांशी ! सोहेल पठाणांनी वेधले लक्ष
शिंदे गटात न गेलेल्या व राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या नगरसेवक सोहेल पठाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शरद पवारांची छबी असलेले टी शर्ट व हातात निष्ठा साहेबांशी, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेब या आशयाचे फलक घेवून ते सभागृहात दाखल झाले. भाजपा वा शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये त्यांनी बसण्यास नकार देत दोघांच्या मध्यभागी खुर्ची टाकून लक्ष वेधले. विशेष म्हणजे भाजपा सत्ताधार्यांनी विरोधी असलेल्या पठाण यांच्या प्रभागात चार रस्ता काँक्रिटीकरणाची व एक इलेक्ट्रीक पोल बसवण्याच्या कामाला मंजुरी देत त्यांना जवळ केल्याने शिंदे गटासाठी ही बाब जिव्हारी लागणारी ठरली.
लोणारींनी फोडला पावणेदोन कोटींच्या भ्रष्टाचाराचा बॉम्ब
गटनेता युवराज लोणारी यांनी सभेच्या अखेरीत पालिकेतील काही अधिकार्यांशी संधान साधून तब्बल पावणेदोन कोटींचे जंतूनाशक बिल तयार करण्यात आल्याचा दावा केला. हा प्रकार म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार असून या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी करीत याप्रकरणी मंत्री सावकारे यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार करणार्यांना आम्ही धडा शिकवणारच, अशी वल्गनाही त्यांनी केली. यावेळी सचिन चौधरी यांनी पालिकेत अनेक बोगस कामे झाल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी केली.
या विषयांना सभागृहात मंजुरी
घनकचरा विषयाशी निगडीत कामांना मंजुरी मिळाली, जळगावातील जैन एरिगेशन सिस्टिमने दाखल केलेल्या दिवाणी दाव्याविरोधात पालिकेची बाजू मांडण्यासाठी अधिवक्त्याच्या नियुक्ती मंजुरी देण्यात आली, हॉकर्स झोनसाठी बांधकाम करणे, दलित वस्ती योजनेंतर्गत विविध भागात काँक्रिटीकरण तसेच पेव्हर ब्लॉक कामांना मंजुरी, शहराच्या चारही बाजूला प्रवेशद्वार उभारणीसाठी आराखडा व अंदाजपत्रक, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मुलांसाठी विविध खेळणी लावण्यास मंजुरी, शहरातील नाल्यांच्या दोन्ही बाजूने सुरक्षा जाळ्यात लावण्यास मंजुरी, तापी नदीवरील संरक्षण भिंत दुरुस्तीला मंजुरी, द.शि.विद्यालयात वर्ग खोल, फरशी बसवण्यास मंजुरी देण्यात आली.
