यावलच्या शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

भांडवल वाढीसाठी सभासद शेअर रक्कमेत केली दुपटीने वाढ


यावल (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. सभेत 10 विषयावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने संस्थेचे भाग, भांडवल वाढीकरीता सभासद शेअर रक्कम ही दुपटीने वाढ करण्यात आली. पूर्वी एक हजार असलेली ही रक्कम आता प्रति शेअर दोन हजार करण्यात आली आहे. यावर काही सभासदांनी आक्षेप घेतला मात्र सर्वानुमते संस्थेच्या भाग भांडवलात वाढ व्हावी या सकारात्मक हेतूने सदर सभासद शेअर रक्कम वाढीला मंजुरी देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 12 वाजता सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन नारायण चौधरी होते. प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन प्रवीण वारके, माजी चेअरमन पांडुरंग सराफ, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, अतुल भालेराव, उमेश भेगडे, बाळू फेगडे, डॉ.नरेंद्र कोल्हे, मुन्ना पाटील सह सर्व संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक तेजस पाटील यांनी तर सभेचे विषय वाचन, अहवालाची माहिती व्यवस्थापक संजय भोईटे, लेखपाल सुरेश यावलकर यांनी दिली.

शेअर रकमेत दुपटीने वाढ
या सभेत संस्थेचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेअर रकमेत दुपटीने वाढ करण्याच्या विषयावर चर्चा झाली. यात काही सभासदांनी सुरुवातीला विरोध दर्शवला. नवीन सभासद जे होतील त्यांनाच प्रत्येकी नवीन शेअरसाठी दोन हजार रुपये घेतले जावे व जुने जे सभासद आहे त्यांच्याकडून मागील प्रमाणेच एक हजार रुपये घेण्यात यावे, असा सूर या सभेत निघाला मात्र संस्थेच्या भाग भांडवलाच्या वाढीसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय व्हावा व जर संस्था चालवायची असेल तर भाग भांडवलदेखील वाढवले पाहिजे हा विषय माजी प्राचार्य डॉ. एफ.एन.महाजन यांनी मांडला. यावर सकारात्मक निर्णय घेत आता सभासद शेअर रक्कम ही दोन हजार रूपये करण्यात आली. संचालक धनंजय फिरके, सुनील नेवे, सागर महाजन, लीलाधर चौधरी, अतुल पाटील, नयना चौधरी, आरती महाजन, हिरालाल चौधरी, सुनील नेवे, विलास चौधरी, देविदास पाटील तसेच शिपाई रामचंद्र भोईटे आदींनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !