विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवन शैलीचा स्वीकार करावा : भुसावळात आरती चौधरी
भुसावळ रेलसिटी इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम
भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनाधीनतेचे वाढते आव्हान लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवन शैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी केले. भुसावळ रेलसिटी इनर व्हील क्लबतर्फे शिवाजीनगर येथील डी.एल.हिंदी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘त्या’ बोलत होत्या.
योग्य संगत निवडावी
आरती चौधरी म्हणाल्या की, व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहल किंवा मित्रांच्या आग्रहातून होते मात्र पुढे त्याचे रूपांतर सवयीत आणि त्यानंतर व्यसनात होऊ शकते. व्यसनामुळे आरोग्यासोबतच शिक्षण, कुटुंब आणि भविष्यातील प्रगतीवरही विपरीत परिणाम होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडावी, व्यसनांना ठामपणे नकार द्यावा आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करावे, असेही आरती चौधरी म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भुसावळ रेलसिटी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शन सत्रात विविध प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘व्यसनाला नकार आणि निरोगी जीवनाला होकार’ देण्याचा सामूहिक संकल्प केला.
या उपक्रमास क्लबच्या अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचापांडे, अनिता महाजन, हेमलता सोनार, अंजली जोशी, आदिती भडंग आदी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य टेंभुर्णीकर, शिल्पा भुता, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



