ज्येष्ठांच्या चेहर्‍यावरील आनंद हाच या विरंगुळा केंद्राचा खरा सन्मान : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

कुर्‍हेपानाचे येथे स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण ; स्पर्धा परीक्षेसाठी आधुनिक अभ्यासिका लवकरच मंजूर करण्याची ग्वाही


भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : आयुष्यभर कुटुंबासाठी, गावासाठी आणि समाजासाठी झटलेल्या ज्येष्ठांना उतारवयात सन्मान, आपुलकी आणि मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा मिळाली पाहिजे. हे विरंगुळा केंद्र म्हणजे ज्येष्ठांच्या अनुभवाचा सन्मान करणारे, त्यांच्या एकटेपणाला आपुलकीची साथ देणारे आणि त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवणारे हक्काचे घर आहे, असे भावनिक प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामदास कोतवाल हे होते.

लवकरच अभ्यासिका मंजूर करणार
मंत्री संजय सावकारे यांनी कुर्‍हेपानाचे गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देत, याच परिसरात स्पर्धा परीक्षेसाठी जनसुविधेअंतर्गत आधुनिक अभ्यासिका लवकरच मंजूर करणार असल्याचे सांगितले. स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक करून पुढे म्हणाले की, ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांचा सन्मान आहे. घरातील आजी-आजोबांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. त्यांच्या अनुभवाची शिदोरी ही पुढील पिढीसाठी अमूल्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्येष्ठांना एकमेकांना भेटण्यासाठी, मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आणि आनंदाचे क्षण घालवण्यासाठी अशा केंद्रांची गरज आहे. येथे वाचन, भजन-कीर्तन, योग, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे व्हावेत. झाडे जगवणे ही आज काळाची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एका बाजूला ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आणि दुसर्‍या बाजूला विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका – येथे अनुभवाचा सन्मान आणि नव्या पिढीच्या भविष्याची तयारी असा सुंदर संगम घडणार, असल्याचेही त्यांनी सांगि

मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कार्यक्रमापूर्वी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विश्वनाथ पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्मित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची चावी व ताबापत्र स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाकडे मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तर माजी सरपंच तथा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे भगवान धांडे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच मंत्री संजय सावकारे व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. टी. टी. यांनी संघाच्या स्थापनेमागील भूमिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच पुढील काळातील नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद गांधेले यांनी केले. आपल्या ओघवत्या आणि प्रसंगानुरूप निवेदनातून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थितांचे आभार स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव संदीप बारी यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, भुसावळातील ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.टी.बाविस्कर, एन.के.पाटील, कुर्‍हे येथील कालिदास कळसकर, माजी सरपंच सुरेश शिंदे, रामलाल बडगुजर, गोजोरे येथील शिवाजी पाटील, भागवत टोंगळे, खंडाळा येथील एम.ए.पाटील, डॉ.पवन बारी, दूध डेअरीचे चेअरमन रवींद्र गांधेले यांच्यासह स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी डॉ.टी.टी.बारी, नवल पाटील, संदीप बारी, सुनील बारी, शरद पाटील, संजय पाटील, आत्माराम धांडे उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !