दुष्काळाच्या झळा तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने कामाला लागावे : भुसावळात मंत्री संजय सावकारेंचे अधिकार्यांना स्पष्ट निर्देश
भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : भुसावळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष गावपातळीवर उतरून काम करावे, अशा स्पष्ट शब्दांत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकार्यांना सुनावले. रोजगार हमी योजनेंतर्गत कामांना वेग देण्याबरोबरच जलसंधारणाची कामे, पीक पंचनामे, पाणीटंचाईचे नियोजन आणि जनावरांच्या चार्याची उपलब्धता यावर तातडीने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भुसावळच्या प्रांताधिकारी कार्यालयात सोमवार, 28 रोजी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंधारणाची कामे प्राधान्याने करा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची गरज आहे. नाल्यांचे खोलीकरण, तलावातील गाळ काढणे आणि अन्य जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावीत, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले. शेतकर्यांना तलावातील अथवा इतर ठिकाणचा गाळ शेतीसाठी घेऊन जायचा असल्यास त्यांना अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत मात्र गाळाच्या नावाखाली अन्य साहित्याची वाहतूक होत नाही ना, याची आवश्यक ती तपासणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावपातळीवरील यंत्रणा सतर्क ठेवा
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी तलाठी आणि ग्रामसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध राहणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक गावांची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांनी कोणत्या दिवशी कोणत्या गावात उपस्थित राहणार, याची माहिती सार्वजनिक करावी. विनाकारण रजा घेऊन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी वरिष्ठ अधिकार्यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
पंचनाम्यांत वस्तुस्थिती समोर आणा
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तालुक्यात पीक पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. महसूल आणि कृषी विभागासह ग्रामसेवकांनी संयुक्तपणे शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करावी. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती नोंदवून पंचनामे करण्यात यावेत, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले. पीकविम्याच्या दाव्यांच्या अनुषंगाने विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही पंचनाम्याच्या वेळी शेतात उपस्थित राहण्यास सांगावे. शेतकरी काही दिवसांनी शेत मोकळे केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करण्यास उशीर करणे आणि त्यानंतर नुकसान नसल्याचे सांगणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वय साधावा, असे निर्देश त्यांनी दिले.
वॉशिंग सेंटरच्या पाणीवापरावर नियंत्रण
शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. दुष्काळी स्थितीत पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनाने सर्व वॉशिंग सेंटर चालकांना पाणी बचतीबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश मंत्री सावकारे यांनी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना दिले.
वन्यप्राण्यांसाठी जंगलात पाण्याची व्यवस्था करा
जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राण्यांचे कळप मानवी वस्तीकडे तसेच शेतशिवारात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा प्रगतिशील शेतकरी किरण चोपडे यांनी बैठकीत मांडला. वनविभागाने जंगल परिसरात तातडीने पाणवठे उपलब्ध करून दिल्यास वन्यप्राण्यांचा गावाकडे होणारा वावर कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
कृषी वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना
वीज वितरण कंपनीचे अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने मंत्री सावकारे यांनी दूरध्वनीवरून संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला. दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा आणि कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये तसेच शासनाच्या निर्देशांनुसार थकबाकी वसुलीची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
टंचाईचे संभाव्य चित्र आधीच तयार करा
तालुक्यातील कोणत्या गावात पाणीटंचाईची शक्यता आहे, कुठे जनावरांच्या चार्याची कमतरता भासू शकते आणि धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती काय आहे, याचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य टंचाईग्रस्त भागांची माहिती संकलित करून त्यावर करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन आठवडाभरात सादर करावे, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.
