यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीचे कोतवाल आरक्षण जाहीर : एका ठिकाणी महिलेला संधी
यावल (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : यावल तहसील कार्यालयात सोमवारी यावल तालुक्यातील आठ गावातील कोतवालांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आठ जागांपैकी एका जागेवर इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेला संधी देण्यात आली. आरक्षण प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले.
एका जागेवर महिलेला संधी
यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजेला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत यावल तालुक्यातील मारुळ, फैजपूर, पाडळसे, टाकरखेडे, दुसखेडा, आमोदा, मालोद, पिंपरूड या गावातील आरक्षण काढण्यात आले. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत बिंदू नियमावलीनुसार संबंधित गावातील उतरत्या क्रमाने असलेल्या लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून सदर आरक्षण काढण्यात आले. आठ पैकी एक जागा ही महिलेसाठी आरक्षित करण्यात आली. ही जागा इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली. ईश्वर चिठ्ठीद्वारे पाडळसे या गावासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
पेसा क्षेत्रातील मालोद या गावात खुल्या प्रवर्गासाठी कोतवालाची जागा आरक्षित करण्यात आली. यावल तालुक्यात यापूर्वीच अनुसूचित जमातीच्या संदर्भातील आरक्षणाचा रेशो पूर्ण झाल्यामुळे येथील जागाही खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आली आहे. आरक्षण सोडत प्रसंगी प्रांताधिकारी बबनराव काकडेसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विभागाचे लिपिक सचिन पाटील, सुयोग पाटील सह ग्रामीण भागातील संबंधित गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
असे आहे गावनिहाय आरक्षण
मारूळ विशेष शैक्षणिक मागास प्रवर्ग एसईबीसी, फैजपूर भटक्या जमाती ब, पाडळसे इतर मागासवर्ग महिला, टाकरखेडा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस, दुसखेडा विशेष मागास प्रवर्ग, आमोदा इतर मागासवर्ग मालोद व पिंपरुड खुला प्रवर्ग असे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे.
