धुळ्यात भेसळीच्या संशयातून सहा लाखांचा 1,854 किलो खवा जप्त
सणासुदीपूर्वीच एफडीएच्या कारवाईने खळबळ : खव्याची संभाजीनगराकडे वाहतूक
धुळे (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धुळे शहरात मोठी कारवाई करत अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या लक्झरी बसमधून तब्बल पाच लाख 80 हजार 500 रुपये किंमतीचा एक हजार 854 किलो मावा (खवा) भेसळीच्या संशयातून जप्त केला. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून आगामी काळात मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी पहाटे पाच वाजता अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या टाटा कंपनीच्या ‘धन बाबा दीप सिंगजी पंजाब लक्झरी बस’ (क्रमांक ए.आर.01 क्यू.4242) ची साक्री रोडवरील विद्यावर्धिनी कॉलेजसमोर तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान बसमध्ये विविध कंपन्यांचा मावा (खवा) आढळून आला. पुढील कारवाईसाठी हे वाहन टोलनाका परिसरातील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आले. या ठिकाणी विविध अन्नपदार्थांचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
11 प्रकारचा हलवा जप्त
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये स्वीट हलवा (खोडल), बल्क स्वीट (खोडल), श्री गोवर्धन गोल्ड स्वीट, कृष्णा हलवा, डेलिस डी लाईट, श्री गोवर्धन गोल्ड (हलवा), जेवण स्पेशल इंडियन स्वीट (वत्सल), ब्रिजवासी स्वीट (हलवा) आदी उत्पादनांचा समावेश आहे. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी वाहनचालक सुलेमान उमरभाई मोदन आणि क्लिनर अल्ताब (दोघेही अहमदाबाद, गुजरात) यांचीही चौकशी करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त (अन्न) गो.वी. माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे तसेच अरविंद राऊत, मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.


