महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा सन्मान ; नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड
नंदुरबार (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : राजर्षी शाहू स्मारक भवन येथे महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळा व पहिले अधिवेशन’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात झाले. या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याला प्रथमच मोठा सन्मान मिळाला. नंदुरबार शहरातील प्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीची अधिकृत घोषणा
कुस्तीचा प्रचार व प्रसार, भव्य दंगलींचे आयोजन तसेच युवा पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संग्राम कांबळे व उपाध्यक्ष अमोल मदने यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. अध्यक्षस्थानी पद्मश्री मुरलीकांत पेटकर होते. . यावेळी हिंदकेसरी, रुस्तमे हिंद व 1966 चे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार तसेच बंडा पाटील रेंट्रेकर यांच्या वतीने त्यांचे पुत्र दिनेश पाटील यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला.
या मान्यवरांचा विशेष सन्मान
याप्रसंगी बाळासाहेब काळे, संग्राम कांबळे, अमोल मदने महाराष्ट्र केसरी समाधान घोडके शामराव जाधव, भगवान बापू करणकाळ,राम कानडे, गोरख पाटील, संजय आवळे, नितीन ठोंबरे, नजीब तांबोळी, सागर येळके, पूनम पाटील, रंगा कचवे, गंगाराज कांबळे, राज यादव, रामचंद्र शिंगे, विश्वास हरुगले, दादा लबडे, संदीप पाटील, जगदीप पाटील, गौरव पाटील, अमृता पुजारी, रोहिणी देवला, विष्णू जोशीकर, रणजीत खाशाबा जाधव, ( ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र) संभाजी पाटील-कुडीतकर, वसंत रंगनाथ कळेकर यांच्यासह एकूण 42 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण!
पै.नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही नंदुरबार जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रासाठीच नाहीतर संपूर्ण कुस्ती जगत साठी अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कुस्तीला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, तसेच ग्रामीण भागातील होतकरू युवा पैलवानांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


