भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.विनोद भंगाळे यांचा ‘भारत गौरव श्री’ पुरस्काराने सन्मान
भुसावळ (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : शहरातील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ग्रंथालय शिक्षक विभाग महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ.विनोद तुकाराम भंगाळे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय स्तर भारत गौरव श्री पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले.
मुंबईत पुरस्काराचे वितरण
कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाळाराम पाटील यांच्याहस्ते डॉ.भंगाळे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.रत्नाकर संपत अहिरे, अभिनेते सतीश देशमुख, ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आशा ज्ञाते, कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा संचालिका मेधा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव यांनी केले.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न
डॉ.भंगाळे यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालयाचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न, नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार, एनसीईआरटी नवी दिल्ली आयोजित शालेय ग्रंथालयांवरील राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिनिधीत्व ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
या राष्ट्रीय सन्मानाबद्दल श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, संगणक विभाग व संगणक विभाग प्रमुख, हेड क्लर्क तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.


