पाचोरा शहरातील 77 हजारांच्या रोकड चोरीची उकल : आंतरराज्यीय आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


पाचोरा (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : वाहन दुरुस्तीच्या कामात व्यस्त तरुणाचे लक्ष चुकवून चोरट्यांनी तरुणाकडील 77 हजार 500 रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आंतरराज्यीय आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली. रितीक राजाराम सिसोदीया (सांसी कडीया, जि.राजगड, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून संपूर्ण 77 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

काय घडले पाचोरा शहरात
तक्रारदार दिनेश निलेश सोनवणे (30, रा. बनोटी, ता. सोयगाव) हा तरुण 19 ऑगस्टला पाचोरा शहरातील टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्यासाठी आला असता बँकेत गर्दी असल्याने ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील स्वराज्य ऑटो गॅरेजवर पोहोचला. वाहन दुरुस्ती सुरू असताना चोरट्यांनी नजर चुकवून 77 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी 21 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी फुटेज तपासल्यानंतर संशयीत रेकी व पाठलाग करताना दिसून आले.

मध्यप्रदेशातून आरोपीला अटक
संशयित आरोपी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाताच 1 ऑक्टोबर रोजी ऑपरेशन एमपी राबवत तपास पथकाने स्थानिक बोडा पोलीस ठाण्याच्या मदतीने 3 ऑक्टोबर रोजी अतिसंवेदनशील सांसी कडिया गावात कारवाई करीत रितीक राजाराम सिसोदीया याला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण 77 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात हवालदार उमेश देविदास पाटील, हवालदार राहुल शिंपी, हरीश परदेशी, श्रीराम शिंपी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !