धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह श्रीरामपूरच्या संशयीताला अटक

उमर्टी पुन्हा चर्चेत : आरोपीचा अन्य तीन साथीदारांसह मोठा गुन्हेगारीचा कट उधळला : एका आरोपीविरोधात तीन गुन्हे


धुळे (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोन गावठी कट्टे (पिस्टल) आणि पाच जिवंत काडतुसांसह श्रीरामपूर तालुक्यातील एका संशयीताला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताने मध्यप्रदेशातील उमर्टीतून हे शस्त्र आणल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासात आरोपीसह अन्य तीन साथीदार मोठा गुन्हा करण्याच्या तयारी होते मात्र त्यापूर्वीच कारवाई झाल्याने अप्रिय घटना टळल्याचे यंत्रणेने कळवले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक संशयीत गावठी कट्ट्यासह शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निर्देश दिल्यानंतर पथकाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ कारवाई केली. यावेळी संशयीत करण दीपक ब्राह्मणे (31, रा.मु.पो. हेरगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या झडतीत 80 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे आणि पाच हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलीस चौकशीत केली दिशाभूल
करण ब्राह्मणे यास गावठी कट्टे आणि काडतुसांबाबत विचारणा केल्यानंतर त्याने ही शस्त्र मध्यप्रदेशातील उमर्टी येथून आणल्याचे व त्यासाठी कल्याणमधील हरीभाऊ उर्फ हरिदास राम पाटील याने 70 हजार रुपये दिल्याचे व डिलेव्हरीनंतर 30 हजार रुपये मिळणार असल्याची आरोपीने कबुल केले मात्र पोलीस चौकशीत आरोपीने खोटी माहिती देत दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तांत्रिक तपासाअंती आरोपीचे साथीदार क्रिष्णा (पूर्ण नाव नाही), सागर अनंता तवले (बालेगाव, वाकलंद, जि.ठाणे), स्वप्नील पारधे यांच्यासह संशयीत गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशात असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर संबंधितानाही खोटी माहिती देणे, कट रचून चिथावणी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात आले. आरोपी सागरविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर, डायघर व हिललाईन पोलिसात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार सदेसिंग चव्हाण, योगेश चव्हाण, संदीप पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र अहिरराव, नरेंद्र गिरासे, आशिष वानखेडे, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !