दोन बैठकींना गैरहजर असलेले उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे सरकारवर नाराज ! उदय सामंतांनी केला मोठा खुलासा
मुंबई (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहिल्याने महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करत शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गैरहजेरीमागील कारणांबाबत खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे कोणत्याही कारणामुळे नाराज नसून, वैयक्तिक अडचणींमुळे ते बैठकांना उपस्थित राहू शकले नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ येथे शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.





‘नाराजी-बिराजी काही नाही, वैयक्तिक अडचणी होत्या’
उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे आणि अडचणींमुळे ते संबंधित बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. या कारणांचा तपशील आपण सध्या उघड करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काही जणांकडून चुकीची माहिती पसरवली जात असून, विरोधकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला. त्यामुळे अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. एकनाथ शिंदे हे गुरुवारी होणार्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
विधान परिषद आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांवर चर्चा
‘नंदनवन’ येथे झालेल्या बैठकीत आगामी विधान परिषद आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तयारीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. शिवसेनेने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागवार बैठकांना सुरुवात केली असून, पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पार पडल्याचे सामंत यांनी सांगितले.
पुणे आणि अमरावती पदवीधर मतदारसंघांमध्ये महायुतीचे जे अधिकृत उमेदवार असतील, त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी एकजुटीने आणि ताकदीने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी सानप यांच्या नावाची चर्चा असल्याबाबत विचारले असता, ही केवळ सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
पुण्यात 15 हजार कोटींच्या ह्युंदाई प्रकल्पाचे उद्घाटन
राज्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने गुरुवारचा दिवस महत्त्वाचा असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आणलेल्या सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या ह्युंदाई कंपनीच्या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पुण्यात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
