राजापूरच्या खाडीत चार मुलांचा बुडून मृत्यू ; एका मुलीला जीवदान


रत्नागिरी (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार गावात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. इंगळवाडी परिसरात आईसोबत खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली पाच मुले पाण्यात बुडू लागली. या दुर्दैवी घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून, एका मुलीला वाचवण्यात यश आले. मृतांपैकी एका मुलाचा मृतदेह अद्याप मिळालेला नसल्याने शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे नाणार गावावर शोककळा पसरली आहे.

खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नाणार येथील इंगळवाडी परिसरातील जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर आपल्या मुलांसह दुपारी साडेतीनच्या सुमारास खाडीत कालवे आणि मुळे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात काम करत असताना मुले पाण्याजवळ होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास खाडीतील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले एकापाठोपाठ पाण्यात बुडू लागली.






या दुर्घटनेत चार मुलांचा जीव गेला, तर एका मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मृत मुलांचे वय चार ते पंधरा वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम
दुर्घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून शोधकार्य हाती घेण्यात आले. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हर्स, बोटी, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर आणि तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. दिवसभर शोधमोहीम राबवूनही संबंधित मुलाचा मृतदेह सापडू शकला नाही.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही शोधमोहिमेत सहभाग घेतला. एका निष्पाप जीवाचा शोध सुरू असतानाच या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !