हायव्होल्टेज ड्रामा ! माजी नगराध्यक्षांनी लेखापालाच्या अंगावर उधळल्या दोन लाखांच्या नोटा
जालना (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : परतूर नगरपरिषद कार्यालयात माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते मोहन अग्रवाल यांनी लेखापाल रघुराज चव्हाण यांच्या अंगावर 500 रुपयांच्या नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदारांची देयके आणि अनामत रक्कम अदा करण्यासाठी 10 टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप करत अग्रवाल यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, लेखापाल चव्हाण यांनी कमिशनखोरीचे आरोप फेटाळत आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
परतूर नगरपरिषदेत घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माजी नगराध्यक्ष मोहन अग्रवाल यांनी लेखापाल रघुराज चव्हाण यांच्यावर कंत्राटदार आणि व्यावसायिकांची अनामत रक्कम तसेच विविध कामांची देयके मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप केला. याच मुद्द्यावरून त्यांनी कार्यालयात चव्हाण यांच्या अंगावर सुमारे दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा केला जात आहे आहे.





लेखापालाने आरोप फेटाळले
या घटनेबाबत रघुराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोहन अग्रवाल हे दोन-तीन व्यक्तींसह कार्यालयात आले होते. त्यांनी आपल्या बिलाबाबत विचारणा केली. मात्र, संबंधित बिल आपल्याकडे आलेले नसल्याचे सांगून, आपल्या अनुपस्थितीत ते सादर झाले असल्यास दोन-तीन दिवसांत तपासून पाहू, असे आपण स्पष्ट केले होते. त्यानंतर अग्रवाल यांनी अंगावर नोटा उधळल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
मुख्याधिकार्यांकडे तक्रार केल्याचा दावा
मोहन अग्रवाल हे वारंवार धमकावून काम करून घेण्याचा प्रयत्न करतात, अशी तक्रार आपण नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत.
दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर परतूरसह जालना जिल्ह्यात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कमिशनच्या आरोपांमागील सत्य काय आणि कार्यालयात नेमके काय घडले, याबाबत आता पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
