जळगाव तालुका हादरला : शस्त्राचा धाक दाखवत भोकरच्या स्टेट बँकेवर दरोडा : ग्रामस्थांच्या सतर्कतेने तिघे गजाआड
जळगाव (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना जळगाव तालुक्यातील भोकर येथे घडली. शनिवार, 31 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या भोकरच्या स्टेट बँकेत प्रवेश करीत व्यवस्थापक आणि रोखपालाला शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण करीत खुर्चीला बांधले आणि रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेले. दरम्यान, पळून जाताना दरोडेखोरांपैकी तिघांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
नियोजनबद्ध दरोडा
शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची गर्दी कमी असल्याचा गैरफायदा घेत दुचाकीवरून पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोर अचानक बँकेत घुसले. आत शिरताच त्यांनी कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवून दहशतीखाली घेतले. बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला मारहाण करत खुर्चीला बांधून ठेवले आणि तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने आपल्याकडील बॅगांमध्ये भरून दुचाकींवरून जळगावच्या दिशेने पळ काढला.

ग्रामस्थांचे धाडस : तिघांना पकडले
दरोडा टाकून पसार होत असताना डिकसाई गावाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दरोडेखोरांना हटकले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला जागीच पकडून बेदम चोप दिला. पाठोपाठ इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. पकडलेल्या संशयितांकडून लुटलेल्या रकमेच्या बॅगाही जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित पसार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून कसून तपास सुरू करण्यात आला. या संशयित आरोपींमध्ये न्यायडोंगरी, तालुका चाळीसगाव येथील खुनाच्या आरोपात नुकताच जामीन झालेला एकाचा तसेच दुसरा बर्हाणपूर येथील संशयीत असल्याची माहिती आहे. पसार एका दरोडेखोराचा जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे पथक शोध घेत आहेत.
दरोड्यात नेमकी किती रोख रक्कम आणि किती किमतीचे सोने लुटले गेलेफ? याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नसून बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.


