भुसावळात आरोग्य सेवकांचा वर्धापनदिन उत्साहात
आरोग्य सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार : रजनी सावकारे
भुसावळ (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : आरोग्य सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आरोग्य समन्वय समितीच्या वतीने भुसावळ नगरीत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आरोग्य सेवकांचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भागांतून मोठ्या संख्येने आरोग्य सेवक उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, महिला व बालकल्याण सभापती शोभा बच्छाव, माजी नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी तसेच तत्कालीन नगरसेविका प्रिया चौधरी यांची उपस्थिती होती.

या मागण्यांवर चर्चा
या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आरोग्य सेवकांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यात आरोग्य सेवक या पदनामात बदल करून त्याऐवजी ग्राम आरोग्य अधिकारी असे नामकरण करण्यात यावे,
आरोग्य सेवकांच्या कर्तव्य व जबाबदार्यांमध्ये सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार सुधारणा करण्यात यावी, आरोग्य सेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ करून सुधारित दरानुसार नवीन प्रवास भत्ता लागू करण्यात यावा, आरोग्य सेवक कर्मचार्यांना विभागीय परीक्षा लागू करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा.
मागण्यांबाबत पाठपुरावा करणार
यावेळी प्रमुख अतिथी रजनी सावकारे यांनी आरोग्य सेवकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करीत मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची व आरोग्य सेवक कर्मचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.


