यावल शहरातील डॉ.ममता वासुदेव मराठे यांनी मिळवली बीएएमएसची पदवी
भुसावळ (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : यावल पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार तथा पोलीस निरीक्षकांचे रायटर वासुदेव मराठे यांची कन्या डॉ.ममता वासुदेव मराठे हिने बीएएमएस (आयुर्वेदाचार्य) पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे मराठे कुटुंबासह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशानंतर अभिनंदनाचा वर्षाव
मुळचे धरणगाव येथील रहिवासी तथा यावल पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार वासुदेव मराठे यांची कन्या डॉ.ममता मराठे हिने 2020 पासून येवला येथील दराडे मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसचे शिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने बीएएमएस (आयुर्वेदाचार्य) पदवी संपादन केली. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार पदवी प्रदान सोहळ्यात मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.संजय पाटील यांच्याहस्ते तिला पदवी प्रदान करण्यात आली.

ममता मराठे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, उपनिरीक्षक एम.जे.शेख सह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.


