पळासखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश
सहा विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदके
जळगाव (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : भारताला जगातील सर्वात विकसीत देश बनवण्यासाठी आपण कोणती पाच महत्त्वपूर्ण कामे करणार आहोत, या विषयावर टाटा उद्योग समूहातर्फे आयोजित निबंध स्पर्धेत पळासखेडे (मिराचे) येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी विविध क्रमांक मिळवत सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांची कमाई केली.
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचालित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) येथे 19 सप्टेंबर 2026 रोजी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गट आणि इयत्ता आठवी ते दहावी हा मोठा गट अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध तपासणीसाठी टाटा उद्योग समूहाच्या मुंबई येथील कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

लहान गटातील यशस्वी विद्यार्थी
लहान गटात कृतिका निलेशसिंह राजपूत हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. हर्षाली प्रवीण पाटील हिने द्वितीय क्रमांकासह रजत पदक, तर स्नेहल प्रदीप पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक प्राप्त केले.
मोठ्या गटातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
मोठ्या गटात आदर्श श्रीराम पाटील याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. दिव्या निलेशसिंह राजपूत हिने द्वितीय क्रमांकासह रजत पदक तर आम्रपाली अनिल गावंडे हिने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेसाठी विद्यालयातील शिक्षक तीर्थराज इंगळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेशसिंह पी.राजपूत (मोहाडी), विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.आर.पाटील, पर्यवेक्षक आर.पी.पाटील, ज्येष्ठ शिक्षक एम.एम.पवार, व्ही.डी.पाटील, जी.पी.पाटील, एच.बी. गरुड, प्रदीप राजपूत, टी. टी. इंगळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून, त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.


