मुक्ताईनगर शहरातील 28 वर्षीय वाहन चालकावर वरणगावनजीक गोळीबार
लोखंडी रॉडने डोक्यावर वार करीत गावठी कट्ट्यातून झाडली गोळी : गोळीबाराचे कारण गुलदस्त्यात
वरणगाव (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : वरणगावनजीक फुलगाव उड्डाण पुलाखालील बायपास रस्त्यावर मुक्ताईनगर शहरातील 28 वर्षीय युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. ही गंभीर घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. हल्ला करणारे संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
काय घडले वरणगावात ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असलम सैय्यद बशीर सैय्यद (वय 28, रा.मुक्ताईनगर) हा युवक डंपरवर चालक असून काम आटोपून दुचाकीने मुक्ताईनगर येथे घरी उड्डाण पुलावरून न जाता पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्याला अडविले.

यावेळी संशयितांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले तसेच गावठी कट्ट्यातून पोटावर गोळी झाडली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेमुळे वरणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील कारण आणि आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


