जळगाव, धुळ्यासह राज्यातील सातहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

एकाच ई-मेल पॅटर्नने खळबळ : इमारती रिकाम्या करून तपासणी सुरू


जळगाव/धुळे (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : जळगावसह धुळे व राज्यातील सातारा, ठाणे, हिंगोली, बीड आणि सोलापूर येथील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली असून तातडीने यंत्रणेने धाव घेत
न्यायालयांच्या इमारती तातडीने रिकाम्या केल्या आहेत. धमकीच्या बॉम्बने प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगावसह धुळ्यात यंत्रणेकडून कसून तपासणी
धुळ्यासह जळगावातील जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्यामार्फत जिल्हा न्यायालय तसेच संपूर्ण न्यायालय परिसराची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली.







ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान इऊऊड पथकाने न्यायालयाची इमारत तसेच परिसराची तपासणी केली. कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद हालचाल आढळून येते का, याची पाहणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान संशयास्पद वस्तू आढळली नाही
बॉम्ब शोधक पथकाकडून करण्यात आलेल्या घातपातविरोधी तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळून आलेली नाही. त्यामुळे तपासणीच्या वेळी न्यायालय परिसरात संशयास्पद बाब निदर्शनास आली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात आली. न्यायालय परिसराची तपासणी करून संभाव्य धोका तपासण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली.

सर्व न्यायालयांना आलेल्या धमकीचा ’पॅटर्न’ एकच
प्राथमिक माहितीनुसार, सातारा, ठाणे, हिंगोली, बीड आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील जिल्हा व सत्र न्यायालयांच्या अधिकृत पोर्टलवर हा धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. एकाच वेळी इतक्या न्यायालयांना धमक्या आल्याने राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सातार्‍यात धमकीचा ई-मेल मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायाधीश, वकील आणि कर्मचार्‍यांना बाहेर काढून न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे.

ठाणे, बीड आणि सोलापूर येथेदेखील समान ई-मेल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून येथेही कामकाज थांबवून कोर्ट रिकामे करण्यात आले असून, तपासणी सुरू आहे. परभणीत धमकी आली नसली तरी खबरदारी म्हणून तेथील न्यायालय परिसरातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर हा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर गुन्हे शाखा, शहर पोलीस, सायबर सेल, आणि दहशतवाद विरोधी पथक तातडीने दाखल झाले. चार मजली इमारतीची गेल्या तीन तासांपासून कसून तपासणी सुरू आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी सदर मेल प्राप्त झाला असून तो मेल नेमका कोणाकडून पाठविण्यात आला याची माहिती घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या इमारतीमध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

सायबर पोलिसांचा तपास सुरू
एकाच वेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या न्यायालयांना लक्ष्य करण्यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. सायबर सेलच्या माध्यमातून हा ई-मेल नेमका कुठून आणि कोणत्या आयपी ड्रेसवरून पाठवण्यात आला, याची तांत्रिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत.

न्यायालये रिकामी केल्यामुळे आणि परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे सर्वत्र तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की यामागे काही मोठे कारस्थान आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !