वीज चोरीचा गुन्हा टाळण्यासाठी 15 हजारांची लाच : जळगावातील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात!
गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या वर्ग दोनच्या अभियंत्यासह दोन कर्मचार्यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईमुळे महावितरणच्या जळगाव शहरातील लाचखोरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (37), वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (45) व वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र छन्नू पाटील (41) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांच्या घरी वीज वापरासंदर्भात शनिवार, 14 रोजी तीन्ही आरोपींकडून तपासणी करण्यात आली. शनिवारी सकाळी 11.15 वाजता आरोपींनी विद्युत उपकरणांचे फोटो काढले. त्यानंतर आरोपी भरत तायडे याने फोन करून तक्रारदाराला पांडे चौकात बोलावत घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे सांगून सर्विस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याची भीती घातली व कारवाई टाळण्यासाठी 40 हजारांची लाच मागितली व लाच न दिल्यास वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याबाबत भीती घातली. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणीत आरोपी तायडे व पाटील यांनी नेमाडे यांच्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
पांडे चौकात लाचखोरांना पकडले
एसीबीने शनिवारी सायंकाळी उशिरा सापळा रचला. आरोपींनी लाच देण्यासाठी तक्रारदाराला पांडे चौकात बोलावले. आरोपी तायडे याने लाचेची रक्कम नेमाडे यांच्याकडे देण्यासाठी सांगितली व त्यानंतर रक्कम स्वीकारताच आरोपींना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश जी.ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.
