राज्यातील खासगी विद्यापीठांच्या फीवर सरकारचा लगाम ! एफआरए कायद्यात मोठी दुरुस्ती होणार ; मनमानी शुल्कवाढीला बसणार चाप


मुंबई (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : राज्यातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची वाढत्या शैक्षणिक शुल्कातून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. खासगी, अभिमत आणि समूह विद्यापीठांकडून आकारल्या जाणार्‍या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (ऋठ-) कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. यामुळे आतापर्यंत सरकारी शुल्क नियंत्रणाच्या कक्षेबाहेर असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांनाही सरकारच्या नियमनाखाली आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधिमंडळात कायदादुरुस्तीचे विधेयक मांडण्यात येणार असून, सेल्फ फायनान्स विद्यापीठांच्या शुल्कावरही एफआरएचे नियंत्रण लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.

कायद्यातील त्रुटी दूर करण्यावर भर
राज्यात 2015 मध्ये लागू झालेल्या एफआरए कायद्यानुसार शासकीय विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार शुल्क नियामक प्राधिकरणाला आहेत. संस्थांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्यास चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची तरतूद आहे.

मात्र, अलीकडच्या काळात राज्यात खासगी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि क्लस्टर विद्यापीठांची संख्या वाढली आहे. सध्याच्या कायद्याच्या कक्षेत या संस्थांचा समावेश नसल्याने त्यांच्या शुल्क निर्धारणावर सरकारचे थेट नियंत्रण नाही. हीच कायदेशीर मर्यादा दूर करण्यासाठी एफआरए कायद्यात सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर सरकारी नियंत्रण आवश्यक असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अवाजवी आर्थिक भार सहन करावा लागू नये आणि संस्थांकडून मनमानी शुल्कवसुली होऊ नये, हा या प्रस्तावित बदलामागील मुख्य उद्देश आहे.

समितीचा अहवाल आल्यानंतर कायदादुरुस्तीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शैक्षणिक शुल्क नियंत्रण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता असून, या निर्णयाकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !