भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या प्रतीक अवसरमल कबड्डीपटूची पश्चिम आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
भुसावळ (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील कबड्डीपटू प्रतीक संजय अवसरमल याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शहादा, जि.नंदुरबार येथे आयोजित आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश) येथे 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली आहे.
महाविद्यालयातर्फे खेळाडूचा सत्कार
शहादा येथे झालेल्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत जळगाव विभागाच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत धुळे, नंदुरबार व एरंडोल विभागाच्या संघांवर मात करून विजय संपादन केला. या स्पर्धेत भोळे महाविद्यालयाचा खेळाडू प्रतीक संजय अवसरमल याने उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते प्रतीकचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ. अनिल सावळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके उपस्थित होते. या खेळाडूला प्रकाश सावळे व प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतीकच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
