यावलमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे यांचे आगमन

नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्याकडून खानदेशी पाहुणचाराची मेजवानी ! हळदी-कुंकवाने वाढवे परिवाराचे औक्षण


यावल (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : विनोदी अभिनयाने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘चला हवा येऊ द्या’ फेम लोकप्रिय विनोदी कलावंत अंकुर वाढवे यांनी बुधवारी सायंकाळी यावल शहराला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनानिमित्त यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या निवासस्थानी छोटेखानी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाढवे परिवाराचे पारंपरिक हळदी-कुंकू लावून औक्षण करण्यात आले. महिलांना साडी-चोळीची प्रेमळ भेट देत खानदेशी संस्कृती आणि आदरातिथ्याचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे, खानदेशातील अस्सल वांग्याचे भरीत, कळण्याची पुरी आणि कोशिंबिरीच्या रुचकर मेजवानीने या भेटीला खास रंगत आणली.

आपुलकीने भारावला वाढवे परिवार
अंकुर वाढवे हे यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांचे लहान बंधू आहेत. दीपावलीच्या निमित्ताने ते सहकुटुंब यावल येथे आले होते. यावेळी नगराध्यक्ष छायाताई पाटील तसेच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. वाढवे यांच्यासोबत नाशिक येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. करुणा वानखेडे-सोनवणे यांचीही उपस्थिती होती.

या कौटुंबिक सोहळ्यात वाढवे परिवारातील महिलांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन साडी-चोळीची भेट देण्यात आली. या स्नेहपूर्ण स्वागताने पाहुणे भारावून गेले. त्यानंतर आयोजित केलेल्या खास खानदेशी भरीत पार्टीचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

विकासकामांची जाणली माहिती
यावेळी अंकुर वाढवे यांनी यावल शहर व तालुक्यातील विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. तसेच खानदेशची प्रमुख ओळख असलेल्या केळी पिकाविषयीही त्यांनी आस्थेने चर्चा केली. सध्या मराठी चित्रपटांसोबतच मलयाळम भाषेतील विविध चित्रपटांमध्येही काम करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भरीत-पुरीच्या पाहुणचाराने जिंकले मन !
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेल्या अंकुर वाढवे यांनी खानदेशात आल्यानंतर येथील प्रसिद्ध वांग्याचे भरीत, कळण्याची पुरी आणि कोशिंबिरीचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेचा मान राखत नगराध्यक्ष छायाताई पाटील व अतुल पाटील यांच्या वतीने खास स्पेशल खानदेशी भरीत पार्टीचे आयोजन करण्यात आले. खानदेशी खाद्यसंस्कृतीची लज्जत, आपुलकीचा पाहुणचार आणि स्नेहपूर्ण वातावरणामुळे अंकुर वाढवे यांची यावल भेट अविस्मरणीय ठरली. महाराष्ट्राच्या विनोदी रंगभूमीवरील लोकप्रिय कलाकाराला खानदेशी संस्कृतीची चव चाखायला मिळाल्याने या भेटीची शहरात चर्चा रंगली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !