जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंग करणार्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम : 526 वाहनचालकांवर कारवाई
दोन लाख 13 हजार 850 रुपयांचा दंड वसूल : वाढते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न
जळगाव (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिसांकडून विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या एकूण 526 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख 13 हजार 850 रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच मद्यपान करून वाहन चालविणार्या 30 जणांविरुद्ध कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई, कंसात केसेसचा आकडा
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह (49)
मोटार वाहन कायद्यानुसार इतर- (356)
फॅन्सी नंबर प्लेट- (15)
कलम 194 बी- (31)
तीन सीट प्रवास- (4)
विना परवाना वाहन चालविणे- (1)
कलम 66/192- (8)
विना हेल्मेट- (62)
मद्यपान करून वाहन चालविणार्यांविरुद्ध कठोर कारवाई
मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोकादायक ठरू शकते त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी केली. जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
