भुसावळमध्ये सिंधी बालकांसाठी ‘बारण जी मोज’ कार्यक्रम उत्साहात
कविता, कथा आणि गीत स्पर्धेत 42 विद्यार्थ्यांचा सहभाग ; सहा विजेत्यांना रोख पारितोषिक
भुसावळ (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या वतीने भारतीय सिंधू सभा, भुसावळ यांच्या सहकार्याने बालदिनानिमित्त सिंधी बालकांसाठी ‘बारण जी मोज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कविता, कथा आणि गीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये एकूण 42 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सिंधी भाषेतील कविता, कथा आणि गीतांच्या माध्यमातून आपले कौशल्य सादर केले. या उपक्रमातून बालकांमध्ये सिंधी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणार्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या वतीने सौरव सिंधे, भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र कानडे, पूज्य बाबा सुनील कुमारजी, नगरसेवक निकी बत्रा, दिनेश दोदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. समन्वयक म्हणून दिनेश दोदानी यांनी जबाबदारी सांभाळली.
सूत्रसंचालन सन्नी रामाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे 400 नागरिकांची उपस्थिती लाभली. सिंधी भाषेतील बालसाहित्य, कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासोबतच नव्या पिढीला आपल्या मातृभाषेशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
