पीक विम्यात प्रत्येक सर्कलचे वेगळे ट्रिगर लावून शेतकरी आणि शासनाची फसवणूक : यावल तहसीलदारांना निवेदन
यावल (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : यावल तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील शेतकरी तसेच शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावल तालुक्यातील शेतकर्यांनी केळी पीक विमा काढला मात्र प्रत्येक सर्कलचे वेगळे ट्रिगर लावून विमा कंपनीने शेतकर्यांची आणि शासनाची फसवणूक केली आहे. उन्हाळा व हिवाळ्याचे ट्रिगरचे पैसे ऑगस्ट महिन्यापर्यंत द्यायचे असून सुद्धा विमा कंपनीने आतापर्यंत ते पैसे खोट्या चौकशीच्या नावाखाली दिले नसल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
काय आहेत आक्षेप ?
यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की, यावल तालुक्यातील पंतप्रधान फळपीक योजनेमधून सन 2025-26 मध्ये केळी पीक विमा ज्या शेतकर्यांनी काढलेला त्या शेतकर्यांचे केळी पीक विम्याचे ट्रिगर बघितले असता केळी विम्याचे तालुक्यामधील प्रत्येक सर्कलचे वेगळे वेगळे ट्रिगर लावून विमा कंपनीने शेतकर्यांचे आणि शासनाची फसवणूक केली. उन्हाळा आणि हिवाळ्याचे ट्रिगरचे पैसे ऑगस्ट महिन्यापर्यंत द्यायचे असून सुद्धा विमा कंपनीने अद्यापपर्यंत हे पैसे खोट्या चौकशीच्या नावाखाली दिलेले नाही.
शेतकर्यांची आर्थिक कोंडी
सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकर्यांची दिवाळी ही अंधारात गेली. विमा कंपनीचे अधिकारी मात्र दिवाळीमध्ये शेतकर्यांची आर्थिक कोंडी करून टिंगल करत आहेत. शासनाने लक्ष देऊन विम्याचे पैसे शेतकर्यांना अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी सोनानी श्रावगी, कैलास चौधरी, योगेश गडे, अतुल भोईटे, दरबारसिंग पाटील, गिरीश देशमुख, सुभाष चौधरी, आशिष पाटील, रोशन चौधरी, निखील देशमुख, पराग देशमुखसह मोठ्या संख्येत शेतकर्यांची उपस्थिती होती.
