बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या अवमानाचा मुक्ताईनगरात निषेध

तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन : दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी


मुक्ताईनगर (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बुधवारी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. शायना एनसी यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असलीतरी कट्टर शिवसैनिकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मुक्ताईनगरात या प्रकाराचा निषेध नोंदवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या
निवेदनात म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील प्रभावी व्यक्तिमत्त्व असून, राज्यातील लाखो नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याचा आरोप समोर आल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राजकीय मतभेद असणे हा लोकशाहीचा भाग असला, तरी त्या मतभेदांच्या नावाखाली आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा अवमान करणे किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कायद्यानुसार हवी कठोर कारवाई
या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन घटनेची सखोल चौकशी करावी, तसेच घटनेशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे, सोशल मीडिया पोस्ट आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींनी जाणीवपूर्वक छायाचित्राचा अवमान केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास लागू कायद्यानुसार कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय मुक्ताईनगर तालुक्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी आणि निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी. प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. राहुल अशोक पाटील, शहरप्रमुख मुकेश कदम, तालुका समन्वयक अ‍ॅड.देवेंद्र बोदडे, अक्षय पालवे व वसीम मंसुती, अ‍ॅड.अशोक बोदडे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !