अक्कलकुव्यात 13 लाखांचा तर नवापूरात दिड लाखांचा ओला गांजा जप्त

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : पाच आरोपींसह दोन वाहने ताब्यात


नंदुरबार (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक आणि वाहतूक करणार्‍यांविरोधात नंदुरबार जिल्हा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. अक्कलकुवा आणि नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन वाहनेही जप्त करीत पाच आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. अक्कलकुवा हद्दीत 12 लाख 95 हजार 500 रुपये किंमतीची ओली झाडे तर नवापूर हद्दीत एक लाख 57 हजार 500 रुपये किंमतीचा तीन किलो 151 ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्कलकुव्यात 13 लाखांची गांजाची झाडे जप्त
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामली गावात गांजाची लागवड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर निर्देश मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या कारवाईत शेतातून तब्बल 27 किलो 910 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 12 लाख 95 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी सांगा निमजा नाईक (रा.जामली, ता.अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापूर हद्दीत एक लाख 57 हजारांचा गांजा जप्त
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवापूर ते पिंपळनेर रोडवरील काळंबा फाट्याजवळ पोलिसांनी दुसरी कारवाई केली. या ठिकाणी दुचाकीतून बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक होत असताना पोलिसांनी कारवाई करीत सचिन छोटीराम बागुल (25), बंटी नवक्या चौधरी (कोकणी) (21, दोघे रा.बागुलनगर पाडा, ता.साक्री, जि.धुळे) आणि दिनेश दिलीप भोये (23, म्हचमाळ, ता. साक्री, जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 57 हजार 500 रुपये किंमतीचा तीन किलो 151 ग्रॅम सुका गांजा व 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एकूण दोन लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दादाभाई मासुळ, दिनेश चित्ते, जितेंद्र तांबोळी, दिनेश वसुले, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक चेतन साळवे, राहुल बोराळे, पोलीस अंमलदार राहुल पांढारकर, अनिल नागरगोजे, विशाल मराठे, हेमंत बारी, रामेश्वर चव्हाण आणि विरेंद्र गावीत आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !