खान्देशातील 221 बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीच्या आमिषाने दोन कोटी 85 लाखांचा गंडा : अलिबागच्या भामट्याला साक्री पोलिसांकडून धुळ्यात बेड्या
धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह साक्री पोलिसांची कामगिरी : आरोपींविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता
धुळे (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस तसेच अन्य शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून खान्देशातील तब्बल 221 बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी साक्री पोलिसात दाखल गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून गुंगारा देणार्या वैभव विजय पोळ (45, रा.रूम 101, ओम सागर अपार्टमेंट, ब्राह्मण आळी, अलीबाग, जि. रायगड) यास संयुक्त कारवाईत धुळे गुन्हे शाखेसह साक्री पोलिसांनी अटक केली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
2021 ते 20 ऑगस्ट 2025 या कालावधीत सखाराम नगर, साक्री व शिवांजली सोल्युशन फर्मच्या माध्यमातून खान्देशातील तब्बल 221 बेरोजगारांची दोन कोटी 85 लाखात फसवणूक करण्यात आली. आरोपींनी बेरोजगार तरुणांना आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस व इतर शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी बनावट नियुक्ती आदेश आणि खोटे कागदपत्र तयार करून तरुणांकडून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी प्रतीक्षा मृणाल शार्दुल (25, कुसूंबा, जि.धुळे) व अन्य नऊ लोकांचा विश्वास संपादन करीत नोकरीची बनावट ऑर्डर देवून फसवणूक केली. शार्दूल यांच्याकडून सहा लाख तर अन्य नऊ लोकांकडून 13 लाख 60 हजार रुपये वसुल करण्यात आले. या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल आहे.
धुळे न्यायालयाबाहेर आरोपी येताच पडल्या बेड्या
23 नोव्हेंबर 2026 रोजी साक्रीचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ओंकार गावळी यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात एक वर्षांपासून पसार आरोपी वैभव विजय पोळ हा धुहे न्यायालयाबाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचला. गुन्हे शाखा व साक्री पोलिसांच्या कारवाईत आरोपीला धुळे न्यायालयाच्या बाहेर बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री प्रभारी व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ओंकार गावळी तसेच धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, साक्रीचे अंमलदार वसंत पाटील, विद्याधर ठाकूर, एजाज पठाण, तुषार जाधव, गुन्हे शाखेचे अंमलदार प्रशांत चौधरी व हेमंत मिस्तरी आदींच्या पथकाने केली.
