केळी पीक विमा पात्र असतांना अचानकपणे अपात्र यादीमध्ये शेतकर्यांची नाव आल्याने शेतकरी संतप्त : यावल तालुका कृषी कार्यालयात शेतकरी धडकले
यावल (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यतील केळी पीक विमा पात्र असतांना अचानकपणे अपात्र यादीमध्ये शेतकर्यांची नाव आल्याने शेतकरी संतप्त झाले. 17 व 18 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द यादीत शेतकर्यांची नावे अपात्र यादीत आल्याने हा प्रकार समोर आला. मोठ्या संख्येत या प्रकरणाचा जाब विचारण्याकरीता शेतकरी वर्ग यावल तालुका कृषी कार्यालयात धडकले.
शेतकरी झाले संतप्त
रब्बी 2025 केळी पीक अंतर्गत पात्र असलेल्या अनेक शेतकर्यांना अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती मात्र नंतर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. यात 17 व 18 नोव्हेंबर रोजी या संदर्भातील पात्र शेतकर्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली या यादीत अनेक शेतकर्यांचे दावे रिजेक्ट केल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली. संतप्त शेतकरी हे यावल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात धडकले व येथे त्यांनी या प्रकाराचा जाब विचारला मात्र तालुका कृषी कार्यालयात देखील शेतकर्यांचे समाधान झाले नाही. एकूणच अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रक्कम भरूनही शेतकरी वंचित
नियमानुसार केळी पीक विमा भरूनही शेतकर्यांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने आणि संबंधित विमा कंपनीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पात्र शेतकर्यांची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
