जामनेर रोडवर मृत्यूचा थरार ! अज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळातील 41 वर्षीय पादचार्याचा अंत
हॉटेल चेतनसमोर मध्यरात्री भीषण अपघात ; धडक देऊन वाहनचालक पसार
भुसावळ (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील जामनेर रोडवर मध्यरात्री भरधाव अज्ञात वाहनाने पायी जाणार्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्यानंतर 41 वर्षीय प्रौढ व्यक्ती ठार झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12.55 वाजेच्या सुमारास हॉटेल चेतनसमोर घडली. संदीप मधुकर बर्हाटे (41, रा.सरस्वती नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री संदीप बर्हाटे हे जामनेर रोडवरील हॉटेल चेतनसमोरून पायी जात असताना तेथून जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात बर्हाटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
धडक देऊन चालक घटनास्थळावरून पसार
अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी व्यक्तीची मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली. याप्रकरणी ऋषभ सुरेश बर्हाटे (27, रा. चोरवड, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार जयेंद्र पगारे करीत असून अपघाताला कारणीभूत वाहनाचा सीसीटीव्ही फुटेजचा आधारे शोध सुरू करण्यात आला आहे.
