धुळ्यात 43 लाखांचा गुटखा जप्त : एकास अटक
धुळे गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून धडक कारवाई
धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून तब्बल 43 लाखांचा गुटखा जप्त केला असून परप्रांतीय चालकास अटक केली आहे. पोलिस चौकशीत गुटख्याची कुठून कुठे वाहतूक होत होती? याची माहिती समोर असून या प्रकरणातील आणखी काही संशयीत जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. 4 रोजी रात्री हनुमान मंदिराजवळील विकास हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
आयशर ट्रक (क्र. एम.एच.04 जी.आर. 9632) च्या झडतीत 43 लाख सहा हजार 236 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत केसरयुक्त विमल पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आली तसेच सात लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक मिळून 50 लाख सहा हजार 236 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयशर चालक मो.रशीद नेवासअली शहा (42, रा. सोहरा माफी, बजहरा, ता.मेहदावल, जि.संतकबीरनगर, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, हनुमान उगले, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, तुषार पारधी, मयुर पाटील, दीपक पाटील व क्युआरटी पथकातील रवींद्र सांगळे, जयेश मोरे, संदीप बाळकृष्ण पाटील व विनोद पंडित गांगुर्डे यांनी केली.


