अकरावी प्रवेश : तुकडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये
शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील : ऑनलाईन झूम मिटींगमध्ये केले मार्गदर्शन
भुसावळ : इयत्ता अकरावीत प्रवेश देतांना मान्यताप्राप्त तुकडीची विद्यार्थी संख्या जेव्हढी असेल तितकेच प्रवेश द्यावे, अतिरीक्त प्रवेश देऊ नये,. अशा अतिरीक्त प्रवेशांना मान्यता दिली जाणार नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली. शुक्रवारी 2020-2021 या वर्षात अकरावी-बारावी प्रवेश प्रक्रिया कार्यपध्दती कशी असेल याविषयी माध्यमिक शिक्षण विभाग, जळगाव व जिल्हा जुक्टो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ऑनलाईन झूम मिटींगमध्ये पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हयाचे दोन विभाग करून पूर्व व पश्चिम अशा स्वरूपाच्या दोन स्वतंत्र बैठका त्यांनी घेतल्या.
सोशल डिस्टन्स नियम पाळण्याचे आवाहन
प्रास्ताविक जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविदयालयीन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे यांनी केले. यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण निरीक्षक आर.एल.माळी यांनी प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी सर्वप्रथम कोवीडची काळजी घेवून प्रवेश प्रक्रिया राबवावी, सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेत, विद्यार्थ्यांनी गर्दी न करता अंतरा-अंतराने मास्कचा वापर करून उभे करावे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी देखील मास्क बांधणे बंधनकारक आहे व ज्यास्थळी प्रवेश दिले जात आहे, असे स्थळ सॅनेटाईज करण्यासोबतच प्रवेश देतांना शासनाने निर्धारीत केलेल्या फी पेक्षा जास्तीचे पैसे घेऊ नये, अशा सूचनाही माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी दिल्या. प्रवेश प्रक्रियेचे परीपत्रक व्हॉटस्अॅपवर प्रसिद्ध केले असून विशेषतः विज्ञान शाखेच्या प्रवेशाला 35 टक्क्यांची अट सक्तीची असून शक्यतो एटीकेटीला विज्ञान शाखेत प्रवेश देउ नये, अशाही सूचना करण्यात आल्या.
यांचाही ऑनलाईन सहभाग
याप्रसंगी जुक्टो संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरूड, कार्याध्यक्ष प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील पाटील, जळगाव जिल्ह्यातील 135 मुख्याध्यापक, प्राचार्य व प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील शंका निरसन केले. झूम मिटींगचे आयोजन बोदवड येथील प्राथमिक शिक्षक सुनील बडगुजर यांनी जिल्हा परीषदेच्या संकेत स्थळावर यशस्वी नियोजन केले. आभार जुक्टो संघटना सचिव प्रा.नंदन वळींकार यांनी मानले. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असल्यास शिक्षण निरीक्षक आर.एल.माळी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले.

