यावलमधील विस्तारीत भागात साडेतीन कोटींच्या कामांचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन


यावल : यावल नगरपरीषदेच्या वतीने विस्तारीत भागातील नवीन पाण्याच्या टाकीवरून विविध 22 कॉलनी परीसरात 23 किलोमीटरची अंतर्गत पाईप लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याप्रसंगी नगराध्यक्षा नौशाद तडवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते व गटनेता अतुल पाटील, मुकेश येवले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

विस्तारीत भागातील नागरीकांना मोठा दिलासा
गेल्या तीन वर्षापासून विस्तारीत भागामध्ये एक कोटी 91 लक्ष रुपये खर्च करून दहा लक्ष लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली होती व जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याची टाकी पर्यंत रायझिंग मेन पाईपलाईनचे कामदेखील पूर्ण झाले होते मात्र वितरण व्यवस्थेचे पाईप लाईनचे काम रखडले होते. डिसेंबर 2019 मध्ये राकेश कोलते प्रभारी नगराध्यक्ष झाल्याने त्यांनी घेतलेल्या पहिल्या सभेत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील तसेच विद्यमान नगराध्यक्षा नौशाद तडवी यांनी पाईप लाईनच्या कामास मंजुरी घेऊन त्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेऊन व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवून घेतले होती व मंगळवारी या कामाचा शुभारंभ खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यात आला.

पालिकेला 20 लाखांचे वाढीव उत्पन्न मिळणार
या कामामुळे विस्तारीत भागातील 22 कॉलनी भागांमध्ये 23 किलोमीटर अंतर्गत पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. नागरीकांना नगरपरीषदेचे हक्काचे पाणी मिळणार असून त्यामुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून नगरपरीषदेा प्रति वर्ष 20 लक्ष रुपये उत्पन्न मिळणार आहे शिवाय नागरीकांचीदेखील सोय होणार आहे. या कामासाठी गटनेता अतुल पाटील यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचे खासदार खडसे यांनी कौतुक केले. याप्रसंगी नगरपरीरषदेचे नगरसेवक मुकेश येवले, रुखमाबाई भालेराव, देवयानी महाजन, पौर्णिमा फलक, कल्पना वाणी, रेखा चौधरी, नगरसेवक समीर मोमीन, शेख असलम, नगरपालिका अभियंता योगेश मदने, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, नितीन सुतार आदींसह कर्मचारी सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !